धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरेंवर अमृता फडणवीसांचा निशाणा, दिले ‘हे’ ४ खोचक पर्याय

156

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवेसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवणे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना देखील यावरून आक्रमक झाली असून त्यांनी शिंदे गटासह भाजपवर टीका केली. तर शिंदे गट आणि भाजपकडूनही शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – काळजी घ्या! मुंबईकरांनो शहरात पसरलीये डोळ्याची साथ)

शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला सर्वांत मोठा धक्का नेमका कशाचा बसलाय, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न विचारत अमृता फडणवीसांनी ४ पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवणे, दुसरा पर्याय म्हणजे ४० आमदार आणि १२ खासदार गमावणे, तिसरा पर्याय म्हणजे प्रदीर्घ काळापासून असलेला भाजपसारखा निष्ठावान युती भागीदार गमावला आणि चौथा पर्याय कट्टर उजव्या विचारसरणीचा हिंदू पक्ष असल्याची ओळख गमावणे, असे ४ पर्याय देत अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले आहे. शनिवारी ८ ऑक्टोबरला रात्री याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटालाही धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. किंबहुना शिवसेना पक्षाचे नावदेखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला पर्याय देणे बंधनकारक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.