शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी हातमिळवणी अशक्य!

कुणाला पतंग उडवायची असेल तर त्यांनी उडवावी, त्यांची पतंग कधी कापायची हे आम्ही जाणतो, असे राऊत म्हणाले

हे सरकार ५ वर्षे चालेल, या शब्दाला शिवसेना जागते, दिलेला शब्द पाळते. पाठीत खंजीर खुपसण्याची शिवसेनेची संस्कृती नाही, त्यामुळे आमची महाविकास आघाडी आहे, ती कायम राहणार आहे आणि हे आमचे सरकार संपूर्ण ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, ज्यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली, मुख्यमंत्री यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली, अशा भाजपातील उपऱ्यांनी भाषा केली, त्यांच्याशी हातमिळवणी कशी करू शकतो?, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना – भाजपा युतीच्या चर्चेला जे उधाण आले होते, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला आहे.

खुशाल पतंग उडवा, ती कधी कापायची आम्ही जाणतो! 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्यासपीठावरील आजी-माजी आणि सोबत आले तर भावी सहकारी’, असे वक्तव्य केले होते. त्याचा अर्थ सांगताना राऊत म्हणाले की, या मागील अर्थ आहे की, विरोधी पक्षातील कुणीतरी महाविकास आघाडीत येण्याच्या तयारीत आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या डेडलाईन नंतरच मुख्यमंत्री बोलले आहेत. पाटलांची डेडलाईन संपली आहे, आता त्यांनाच विचारा, असे सांगत शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. पाठीत खंजीर खुपसत नाही, हीच ठाकरे कुटुंबियांची खासियत आहे. कुणाला पतंग उडवायची असेल तर त्यांनी उडवावी, त्यांची पतंग कधी कापायची हे आम्ही जाणतो, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर! कुठे टाकल्या धाडी?)

महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडीच!

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसले, म्हणून तर्क काढण्याची गरज नाही. शेवटी राजकरणात सगळे सहकारी असतात. उद्या मी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाईन, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मतभेद असतील, पण महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणे ही लोकांची आणि कार्यकर्त्यांशी गद्दारी ठरेल. एमआयएम, धर्मांध शक्तींना थांबवण्यासाठी महाविकास सक्षम आहे, तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात घालून चालत आहे, पुढील ३ वर्षे हे सरकार अधिक गतिमान पद्धतीने चालणार आहे, याची विरोधी पक्षाने खात्री बाळगावी, असे संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here