मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मालेगाव येथे झालेल्या आपल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटावर केलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत काय घडलं त्याचा मी साक्षीदार आहे, योग्यवेळी त्याबद्दल बोलेन, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पण यावरुन आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
केदार दिघे यांचे ट्वीट
केदार दिघे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जर तुम्ही आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचे साक्षीदार होतात तर मग इतके दिवस गप्प का बसलात?, असा थेट सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे, असा आरोपही केदार दिघे यांनी केला आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?
— Kedar Dighe (@MiKedarDighe) July 30, 2022
(हेही वाचाः ‘आनंद दिघेंबाबत जे झालं त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार!’ मुख्यमंत्र्यांचा इशारा)
काय म्हणाले शिंदे?
धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे काही झालं आहे त्याचा मी साक्षीदार आहे. सिनेमातून मी फक्त उदाहरण दिलं आहे पण धर्मवीरांच्या प्रत्यक्ष जीवनात काय झालं ते मला माहीत आहे. योग्यवेळी मी त्याबाबत नक्की बोलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community