अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बनवण्यात आलेल्या पोस्टमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची छायाचित्र लावण्यात आली होती. परंतु यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार असून या पक्षाच्या केवळ पाचच नेत्यांचे फोटो सोशल मिडियावरील बॅनरवर प्रदर्शित केले होते. परंतु काँग्रेसच्या सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ नेत्यांचे फोटा लावण्यात आले होते. लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्या तरी त्या नक्की शिवसेनेच्या उमेदवार आहेत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या असा प्रश्न विभागातील जनतेलाच पडला. साध्या या बॅनरवर शिवसेनेच्या महिला विभाग संघटकालाही स्थान दिले नाही.
( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या ‘सुमार’ द्वादशीवारांनी साहित्यक्षेत्र नासवले; भाजपाची टीका)
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. लटके यांच्या महापालिकेतील सेवेच्या राजीनाम्याबाबत उठलेल्या वादावर न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेला त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यास भाग पाडले आणि त्यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी मंजूर झाल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसैनिकांना मोठ्याप्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन सोशल मिडियावर बॅनरद्वारे केले होते. यामध्ये ‘येताय ना फॉर्म भरायला’ अशी साद घालण्यात आली होती. परंतु या सोशल मिडियावरील बॅनरवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार गजानन किर्तीवर आणि अनिल परब यांची छायाचित्रे आहेत.
परंतु काँग्रेसच्या सोनिया गांधी,राहुल गांधी, नाना पटोले, भाई जगताप, संजय निरुपम, सुरेश शेट्टी,क्लाईव्ह डायस अशाप्रकारे सात नेत्यांचे फोटो लावण्यात आले, राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार,जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राखी जाधव, अजित रावराणेआणि सलीम मापकर या सात नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहे. शिवसेनेचा उमेदवार असूनही त्यांनी आपल्या विभागातील अन्य नेते किंवा महिला विभागप्रमुख राजुल पटेल यांची छायाचित्र लावली नाही.
शिवसेनेचा उमेदवार असूनही सोशल मिडियावरील बॅनरवर शिवसेनेच्या केवळ पाच नेत्यांचेच फोटो लावण्यात आले,तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी सात नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक जिल्हाप्रमुखाला स्थान देण्यात आले, परंतु शिवसेनेला महिला उमेदवाराच्या प्रचारात महिला आघाडीच्या विभाग संघटकालाही फोटोत स्थान देता आले नाही. त्यामुळे शिवसेनेत आता कुणालाच मोठे करायचे नाही,असाच पावित्रा पक्षफुटीनंतर ठाकरे गटाने स्वीकारला का असा सवाल उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community