लटकेंच्या विजयाचा आनंदोत्सव, पण अपक्षांसह नोटाला मिळालेल्या मतांमुळे विचार मंथन करण्याची गरज!

151

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा ६६ हजार ५०० मतांनी विजय झाला. लटके यांच्या विजयानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाने मुंबईत जोरदार जल्लोष केला. परंतु या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते ही नोटाला मिळालेली असून भाजपने नोटाला मतदान केल्याचा आरोप शिवसेना पक्षाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदार पुढे आले नाही की मतदान केले नाही. त्यामुळे नोटाला झालेले मतदान हे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव केला जात असला तरी कमी झालेले मतदान आणि नोटांचे वाढलेले मतदान यामुळे शिवसेनेला विचार मंथन करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

( हेही वाचा : ‘चला जाणूया नदीला’… सरकारच्या अनोख्या उपक्रमाला सुरूवात! )

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ६६ हजार ५३० मते मिळाली, तर नोटाला १२ हजार ८०६ एवढे मतदान झाले. अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाटी १५७१, नीना खेडेकर १५३१, बाला नाडार १५१५, फरहान सय्यद १०९३ आणि मिलिंद कांबळे यांना ६२४ एवढे मतदान झाले. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नसल्याने लटके यांचा विजय हा आधीच निश्चित झाला होता, परंतु या विजयापेक्षा त्या अधिकाधिक मते किती मिळवतात किंबहुना शिवसेना फुटल्यानंतर शिवसैनिक जास्तीत जास्त मैदानात उतरुन कशाप्रकारे मतदानात भाग घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु प्रत्यक्षात या निवडणुकीत ३१.७४ टक्के एवढेच मतदान झाले.

एकूण ८६ हजार ५७० मतांपैकी १२ हजार ८०६ मते ही नोटाला मिळालेली आहेत. म्हणजे एकूण मतदानाच्या १५ टक्के मते ही नोटाला मिळालेली आहेत, तर विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी मिळवलेल्या मतांच्या ६६ हजार ५०३ मतांच्या तुलनेत नोटाला २० टक्के मतदान झाले आहे. या पूर्वीच्या सन २०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत नोटाला अनुक्रमे २.०९ टक्के आणि १.०७ टक्के एवढी मते मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीतील ही मते निश्चितच मशालीच्या चिन्हावर नव्याने राजकीय पर्वाची सुरुवात करणाऱ्या शिवसेना पक्षासाठी धोक्याची सूचना आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात नोटाला मतदान म्हणजे विजयी उमेदवाराला या लोकांनी नाकारले असे स्पष्ट होत आहे. यापूर्वीच्या कोणत्याही अपक्षाला हजारांचा पल्ला गाठता आलेला नाही तिथे तीन अपक्ष उमेदवारांनी दीड हजारांचा तर एक उमेदाराला हजारांच्या मते मिळवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व अपक्षांना मिळून सहा हजारांहून अधिक मते तर नोटाला सुमारे तेरा हजारांहून अधिक याप्रकारे २० हजार मते ही मिळालेली नाही.

पोटनिवडणूक ही नेहमीच सहानुभूतीच्या लाटेवर जिंकली जाते. या ठिकाणी भाजपनेही आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे मागील निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत ही निवडणूक लढवताना रमेश लटके यांना ६२ हजार ७७२ एवढी मते मिळाली होती. परंतु याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असल्याने आणि मशाल चिन्हावर प्रथमच ही निवडणूक लढवली जात असल्याने, शिवाय शिवसेना फुटल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने एकप्रकारे सरकार विरोधातील राग मतपेटींतून व्यक्त करण्यासाठी मोठ्याप्रमाणात शिवसैनिक रस्त्यांवर उतरतील अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात ना जास्त मतदान झाले ना झालेले मतदान शिवसेनेच्या पारड्यात पडले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आधीच बाहेर पडले नाही आणि त्यांनी मतदानही शिवसेना उमेदवाराला केले नाही,असा अंदाज शिवसेना नेत्यांकडूनच खासगी व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मतदारांनी शिवसेनेला दगा दिल्याचेही बोलले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने नोटाला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे व्हिडीओ शिवसेनेने व्हायरल केले असले तरी भाजप हा पक्ष धुर्त असून तो आपल्या मतदाराला नोटाकडे वळवणार नाही. परंतु एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी नोटाच्या माध्यमातून शिवसैनिकांनीच व्यक्त करत लटके या आपल्याला मान्य नसल्याचे दाखवून दिले. तसेच अपक्षांना झालेले अधिक मतदान पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मतदान झाले तेही अपक्षांनाच झाले असावे असे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना भविष्यात अशाचप्रकारे धोका देत केवळ स्वत:चा फायदा करून देत शिवसेनेचे उमेदवार कमी कसे येतील याचीच रणनिती आखणारे असल्याने शिवसेनेला येत्या काळात स्वबळावरच निवडणूक लढवणे फायदेशी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना स्वबळावर लढली तरच शिवसैनिकांची सहानभूती चांगली मिळू शकते,असेही बोलले जात आहे. तसेच यामाध्यमातून शिवसेनेची खरी ताकदही समजेल,असेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.