अंधेरी पोटनिवडणूक: तर भाजपलाही ही निवडणूक सहानभूतीवर लढता आली असती

131

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक यंदा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. प्रत्येक पोटनिवडणूक ही आपण जिंकतो असा दावा वारंवार शिवसेनेकडून केला गेला. परंतु या निवडणुकीत शिवसेना पक्षही नाही आणि त्यांचे धनुष्यबाण हे चिन्हही नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विजयाचा मार्ग अधिक सूकर झाल्याचे दिसून येत असले तरी याठिकाणी भाजपने दिवंगत नगरसेवक सुनील यादव यांच्या पत्नी माजी नगरसेविका संध्या यादव यांना उमेदवारी दिली असती, तर खऱ्या अर्थाने भाजपला भावनिक मुद्दयावर निवडणूक लढता आली असती. त्यामुळे लटके यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नसले तरी सहानुभूतीची मोठी लाट असल्याने भाजपची उमेदवार निवड चुकली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचा १२ मे रोजी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने या रिक्त जागी पोटनिवडणूक जाहीर झाली. येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभेत मतदार पार पडेल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना उध्दव ठाकरे गटाने आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी घोषित केली होती आणि त्यांच्या मुलाची नियुक्ती युवा सेनेच्या पदाधिकारीपदी केली होती. शिवसेनेने ही निवडणूक भावनिक मुद्दयावर लढण्यासाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली असली तरीही भाजपलाही भावनिकतेच्या मुद्दयावर ही निवडणूक लढण्याची नामी संधी होती. रमेश लटके आणि भाजपचे सुनील यादव यांची घट्ट मैत्री होती, तसेच त्यांच्या पत्नीही चांगल्या मैत्रीणी आहेत. दोघांच्या पतीचे निधन झाल्याने उध्दव गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून संध्या यादव यांना निवडणूक रिंगणात उतरवले असते भाजपलाही शिवसेना उध्दव ठाकरे गटाविरोधात भावनिक मुदद्यावरच आव्हान देता आले असते.

 रमेश लटके सन १९९७ ते २००२, सन २००२ ते २००७ आणि २००७ ते २०१२ पर्यंत ते नगरसेवक होते, तर सन २००९ मध्ये त्यांनी प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता, परंतु सन २०१४मध्ये शिवसेना भाजप यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यात भाजपचे सुनील यादव यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला होता. तर सन २०१९ मध्ये  लटके हे युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढले आणि त्यांनी ६२ हजार ७७३ मते घेतली होती, तर भाजपचे बंडखोर उमेदवार मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये लटके यांनी तब्बल १७ हजार मतांनी पटेल यांचा पराभव केला होता. मुरजी पटेल यांना त्या  निवडणुकीत ४५ हजार ८०८ आणि काँग्रेसचे उमेदवार जगदीश अमिन कुट्टी यांना २७ हजार ९५१ मते मिळाली होती.

( हेही वाचा: “…म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ तुम्ही कॉंग्रेसच्या दावणीला बांधला”, भाजपानं ठाकरेंना फटकारलं )

मुरजी पटेल हे  भाजपचे प्रबळ दावेदार असले तरी पोटनिवडणूक ही भावनिक मुद्दयावर लढली जात असल्याने त्याविरोधात कोणताही बलाढ्य उमेदवार दिला तरी त्यांचा विजय होणे अशक्यच असते.  यापूर्वी वांद्रे विधानसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूरच्या विधानसभा निवडणुकीत ते दिसून आले. मुरजी पटेल हे श्रीमंत असले आणि मागील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ते स्वत: व त्यांच्या पत्नी केशरबेन निवडून आल्या असल्या तरी त्यांचे जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये त्यांचे नगरसेवकपद रद्दबातल ठरले. त्यातच मुरजी पटेल यांच्या विरोधात एसआरए प्रकरणांमध्ये अनेक तक्रारी असून शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि त्यांचे चिन्ह नसले तरी जनमानसांमध्ये या निवडणुकीबाबत ऋतुजा लटके यांच्या विरोधात उभ्या केलेल्या मुरजी पटेल यांच्याविरोधातील वातावरण तयार होऊ शकते आणि भाजपबद्दलचे वेगळे मत निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर संध्या यादव यांना उमेदवारी दिली असती तर भाजपला आपल्या अंगावर काहीही न घेता भावनिकतेच्या नावावर ही जागा निवडून आणता आली असती. परंतु भाजपने अतिआत्मविश्वास दाखवत मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली असली तरी आणि यात पटेल जिंकले तरी भाजपवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप होईल. त्याऐवजी संध्या यादव यांना उमेदवारी दिल्यास आणि त्या निवडून आल्यास भाजपलाही जिंकल्याचे समाधान होईलच शिवाय कुणालाही भाजपला नाव ठेवण्याची जागा उरणार नाही. एवढेच नाही तर दिवंगत सुनील यादव यांचेही स्वप्न साकार करून त्यांना श्रध्दांजलीही वाहता येईल,असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.