बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले कट्टर शिवसैनिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना लॉटरी लागली आहे. कीर्तिकर यांच्याकडील स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले आहे.
गजानन कीर्तिकर यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्याकडील स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद कुणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. किंबहुना हे पद मिळवण्यासाठी ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यात सुभाष देसाई, विनायक राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचा समावेश होता. त्या सर्वांना मात देत अनिल देसाई यांनी आपले पद निश्चित केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिय लोकाधिकार समितीत सक्रिय असलेले अनिल देसाई हे या समितीचे सरचिटणीस होते. राज्यातील ८० टक्के नोकऱ्यांमध्ये मराठी भाषिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी ही समिती काम करते. लोकाधिकार समितीचे प्रमुख पद खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे होते. त्या ठिकाणी आता राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१० हजारांहून अधिक सभासद
शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. तिचे दहा हजारांहून अधिक सभासद आहेत. लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात विमा, तेल, विमान वाहतूक, रेल्वे, संशोधन, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये सक्रिय आहे.
Join Our WhatsApp Community