माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना फरार घोषित करावे, कारण देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचे काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचे काम करत आहेत, असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.
देशमुखांची सर्व संपत्ती जप्त करा!
संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी खळबळजनक आरोप केले. अनिल देशमुखांच्या वकिलाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच दिली. त्यामुळे अशा व्यक्तींना बाहेर ठेवणे धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
मुख्यमंत्री स्वतः घोटाळेबाज!
महाविकास आघाडीतील भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीतील 12वा खेळाडू हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत, ही यादी वाढणार आहे. कारण मुख्यमंत्री स्वत: घोटाळेबाज आहेत. त्यांनी १९ बंगले बांधले. बायकोच्या नावावर बंगले बांधतात, कुठे गायब करतात माहीत नाही. हे घोटाळे असेच चालू राहिले तर यादी वाढणारच, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
दोन रिसॉर्ट अनधिकृत
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांवरही भाष्य केलं. अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचे नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असे आहे. तर दुसऱ्याचे नाव सी-कॉन्च रिसोर्ट असे असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचे लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत आहेत, असेही सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community