सीबीआय चौकशीत अनिल देशमुखांचे एकच उत्तर ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचे सांगत महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिका-यांचा हा प्रयत्न आहे, असेही सीबीआयच्या चौकशीत म्हटले.

175

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी १४ एप्रिल, बुधवारी रोजी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांची चौकशी केली. त्यावेळी बहुतांश प्रश्नांना देशमुख यांनी ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’, असेच उत्तर दिल्याचे सूत्रांकडून समजते.

साडेआठ तास केली चौकशी!

परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप करताना अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलिस सचिन वाझे याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले. त्यानुसार अनिल देशमुख चौकशीसाठी DRDOच्या गेस्ट हाऊसमध्ये सकाळी १० वाजताच हजर झाले होते. कलिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी सुरू होती. तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. सीबीआयचे अधीक्षक दर्जाचे अधिकारी आयपीएस अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून माजी गृहमंत्री देशमुख यांची चौकशी झाली.100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून सुरू असलेल्या प्राथमिक तपासात ही चौकशी करण्यात आली.

(हेही वाचा : एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची अचानक बदली! चर्चेला उधाण)

देशमुखांनी आरोप फेटाळले!

चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांनी बहुतांश आरोप फेटाळले. त्यांच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे, असे सूत्रांकडून समजते. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिका-यांचा हा प्रयत्न आहे, असेही देशमुख म्हणाले. यावेळी देशमुखांनी अनेक प्रश्नांना ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’ , असेच उत्तर दिले. डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केले कि, मी त्यांना कोणतीही वसुली करायला सांगितले नाही, मुंबई पोलिसांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत जी बाब समोर आली, त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे देशमुख यांनी सीबीआय चौकशीत म्हटल्याच सूत्रांनी म्हटले आहे.

काय आहे हे प्रकरण? 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस सचिन वाझे याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले. त्यानुसार अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांचेही जबाब नोंदवण्यात आले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास पथकाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची सुमारे चार तास चौकशी केली, त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सीबीआयकडून अनिल देशमुख यांनाही समन्स पाठवला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.