10 जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला होता. पण हा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पण आता अनिल देशमुखा यांच्या मतासाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग आला असून, आता अनिल देशमुख यांनी पीएमएलए न्यायालयाच्या विरोधात आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
(हेही वाचाः भाजप विधानपरिषदेसाठीही आक्रमक, सहाव्या जागेसाठी सदाभाऊंना पाठिंबा)
उच्च न्यायालयात सुनावणी
विशेष पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आता अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर आता गुरुवारी सकाळी राज्यसभा निवडणुकीच्या आधी तातडीची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना मतदान करायची परवानगी मिळणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
(हेही वाचाः राज्यसभा निवडणुकीतील मतांचा कमी झाला ‘कोटा’! कोणाचा ‘फायदा’, कोणाचा ‘तोटा’?)
कसे आहे गणित?
शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यामध्ये राज्यसभेची ही लढाई रंगणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपकडे २२ अतिरिक्त मते असून, अन्य ७ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशी एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी १३ मतांची गरज आहे. पण आता देशमुख आणि मलिकांची मते बाद होऊन, मतांचा कोटा कमी झाल्यामुळे याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
Join Our WhatsApp Community