अनिल देशमुखांचा ईडी कार्यालयात येण्यास नकार! ‘हे’ दिले कारण!

या प्रकरणी आधी सीबीआयकडून चौकशी सुरु होती, त्यानंतर या प्रकरणात मनी लॉन्डरिंगचा आरोप झाल्यावर या प्रकरणात ईडीने उडी घेतल्यापासून देशमुखांचा अडचणी आणखी वाढल्या आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या २ खासगी सचिवांना ईडीने अटक केल्यानंतर ईडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा समन्स बनवून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला. मात्र देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी ईडीला पत्र पाठवून देशमुख येणार नसल्याचे कळवले आहे. ईडीने नोटीस पाठवताना सोबत कोणत्या केससाठी बोलावले आहे, हे कळवले नाही. त्याविषयी माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

१०० कोटी वसुलीच्या आरोपामुळे सध्या सक्तवसुली संचलनालय (ईडी) ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांची ईडीने चौकशी केल्यावर २५ जून रोजी रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर लागलीच देशमुख यांना शनिवारी, २६ जून रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे देशमुखांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनी लॉन्डरिंगचा आरोप झाल्याने अडचणीत वाढ!  

या प्रकरणी आधी सीबीआयकडून चौकशी सुरु होती, त्यानंतर या प्रकरणात मनी लॉन्डरिंगचा आरोप झाल्यावर या प्रकरणात ईडीने उडी घेतल्यापासून देशमुखांचा अडचणी आणखी वाढल्या आहेत. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(हेही वाचा : १० बार मालकांनी अनिल देशमुखांना दिले ४ कोटी? )

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकास(पीए) ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी ‘वाझे वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना आज ईडीने अटक केली. मला खात्री आहे पुढील काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर  सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.

आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

केंद्रीय एजन्सीचा वापर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. लातूर येथे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यामध्ये मागच्या काळात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल नोंदवले गेले होते. त्यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपपत्राचा वापर करून किंवा बाहेरुन आरोप करुन अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू झाला असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर यापूर्वी सीबीआयने धाडी टाकल्या होत्या त्यात त्यांना काही सापडलं नाही. म्हणून आठ – दहा वर्षापूर्वीचे जुन्या गोष्टी उकरून काढून त्या त्रुटींवर बोट ठेवून अनिल देशमुख यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न ईडीमार्फत होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here