एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय, पुन्हा बैठक

न्यायालयाच्या निर्णयापर्यंत पर्यायी तोडगा काढण्यास प्रयत्नशील

94

गेल्या 15 दिवसांपासून एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप कोणताही तोडगा यावर निघालेला नाही. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांमधील बैठक सुरू असताना अनिल परबांनी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. तर हा संप मागे घ्यावा असेही आवाहन समस्त एसटी कर्मचाऱ्यांना केले.

(हेही वाचा -परमबीर सिंह, ३० दिवसांत हजर व्हा! न्यायालयाचा आदेश)

उद्या सकाळी पुन्हा बैठक

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान, अनिल परब म्हणाले, जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा. उद्या सकाळी पुन्हा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली असल्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिलेत.

…ऑफर दिलेली नाही तर

आज आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. तसेच आजची चर्चा सकारात्मक झाल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही ऑफर दिलेली नाही, संघटनेला दोन ते तीन पर्याय दिले आहेत. आम्ही अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो, ही वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय दिला तर विलिनीकरणानंतरही पगारवाढ देण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.