किरीट सोमय्या म्हणतात… परब म्हणजे “चोर मचाये शोर”

78

अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत फाईव्ह स्टार रिसॉर्ट बांधले आणि आपल्या पदाचा दुरुपयोग केला. पर्यावरण मंत्रालय, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी हे रिसॉर्ट अनधिकृत असून संबंधित मालकांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

अनिल परब यांनी २ मे २०१७ रोजी १ कोटी रुपये देऊन विभास साठे यांच्याकडून शेत जमीन विकत घेतली, त्याच दिवशी त्या जागेचा ताबा घेतला असे ही करारात नमूद केले आहे. सप्टेंबर २०१७ नंतर या जागेवर बांधकाम सुरु झाले. परब यांनी  विभास साठे यांच्याकडून समुद्र किनाऱ्यावरील ही जागा शेत जमीन म्हणून विकत घेतली. याचे रजिस्ट्रेशन १९ जून २०१९ रोजी केले. हा करार २०१९ रोजी झाला असला तरीही या खरेदीखतात स्पष्ट म्हटले आहे की, जागेचा कब्जा हा मे २०१७ मध्ये परब यांनी साठे यांच्याकडून घेतला, ही जागा शेत जमीन आहे असे ही खरेदीखतात स्पष्टपणे सांगितले आहे. त्याच्यावरील स्टॅम्प ड्यूटी सुद्धा शेत जमिनीची भरण्यात आली आहे. त्यामुळे अनिल परब म्हणजे “चोर मचाये शोर” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

घोटाळा उघडकीस आल्यावर जमीन विकली

या जागेची व्यावसायिक बांधकामाची घरपट्टी  नोव्हेंबर २०१९ मध्ये अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला स्वत:च्या नावाने बँक खात्यातून भरली. मार्च २०२० मध्ये त्यांनी महावितरणाकडे रिसॉर्टसाठी ३ फेज वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आणि वीज कनेक्शन घेतले. परब यांचे घोटाळे किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये उघडकीस आणल्यानंतर २९ डिसेंबर २०२० रोजी परब यांनी त्यांचे व्यावसायिक मित्र व भागिदार सदानंद कदम यांच्याशी ही जागा विकण्याचा खरेदी करार केला. २१ मार्च २०२१ रोजी ही जागा शेत जमीन म्हणून ठाकरे सरकारने सदानंद कदम यांच्या नावे केली.

( हेही वाचा :  राज्यात ओमायक्रॉनची पासष्टी… )

कारवाई होणार

जून २०२१ मध्ये  किरीट सोमय्या यांच्या तक्रारी नंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या टीमने या जागेची पाहणी केली व हे बांधकाम CRZ ना बांधकाम क्षेत्रात (No Development Zone) असल्यामुळे याच्यावर कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. माननीय राज्यपालांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे लोकायुक्तांना निर्देश दिले होते. लोकायुक्तांसमोर महाराष्ट्र सरकारने हे रिसॉर्ट फसवणुकीने बांधण्यात आले असल्याचे मान्य केले. लोकायुक्तांनी आता अनिल परब यांनाही नोटीस पाठविली आहे.

चेन्नई येथील केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूटने स्पष्टपणे सांगितले आहे की, २०१७ पर्यंत ही जागा शेत जमीन होती, कोणतेही बांधकाम नव्हते. नोव्हेंबर २०१७ पासून बांधकाम सुरु झाले आणि जानेवारी २०२१ मध्ये रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झाले असा  अहवाल या इन्स्टिट्यूटने दिला आहे. अनिल परब यांनी फसवणुकीने, आपल्या पदाचा गैरवापर करून हे रिसॉर्ट बांधले आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.