मंत्री अनिल परब यांची १० तासांपासून ईडीक़डून चौकशी

मनी लॉण्डरिंग प्रकरणात शिवसेनेचे नेते तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांची मागील दहा तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. मंगळवारी राज्यात राजकीय भूकंप झालेला असताना शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्यामुळे राजकीय चर्चेला अधिकच उधाण आले आहे. या प्रकरणात परब यांना ईडीकडून अटक करण्यात येणार की चौकशी करून सोडण्यात येणार आहे याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही.

वेळ मागून घेतलेला

दापोली येथील ‘साई रिसोर्ट’ प्रकरणात ईडीने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अनिल परब यांना यापूर्वी चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. मात्र परब यांनी अगोदरच ठरलेल्या कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहता येणार नसल्याचे ईडीला वकिलामार्फत कळविले होते व वेळ मागून घेतली होती. दरम्यान ईडीने अनिल परब यांना सोमवारी दुसरे समन्स पाठवून मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. राज्यात राजकीय भूकंप आलेला असताना अनिल परब हे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. राज्यात राजकीय भूकंपावर भूकंप होत असताना ईडीच्या कार्यालयात परब यांच्याकडे मनी लॉण्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू होती. परब यांची सकाळी सुरू असलेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, त्यांना उशिरापर्यंत सोडण्यात न आल्यामुळे परब यांना या प्रकरणात अटक होते की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

(हेही वाचा एकनाथ शिंदेच्या चार अटी, नको महाविकास आघाडी!)

अनिल परब ईडी कार्यालयातून निघाले. त्यांना उद्या पुन्हा चौकशी साठी बोलविण्यात येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. मागील अकरा तासापासून अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सकाळी साडे अकरा वाजता चौकशीला हजर झालेले अनिल परब हे रात्री पावणे अकरा वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

ईडीच्या चौकशीला सामोरे गेलो -अनिल परब

दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी विचारलेली सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली असून ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्याचे परब यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणात दाखल केलेल्या गुन्हयात ईडीने चौकशीत जे प्रश्न विचारली त्यांची उत्तरे मी दिली आहेत. मी ईडी कार्यालयात असल्यामुळे बाहेर काय घडले याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत परब यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here