अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत

येत्या काही दिवसांत अनिल परब देखील देशमुखांप्रमाणेच रडारवर येतील, असे म्हटले जात आहे.

161

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या आणि विशेषत: माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या रडारवर असेलेले परिवहन मंत्री अनिल परब आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता परब यांना त्यांचे दापोलीतील रिसॉर्ट भोवणार असून, किरीट सोमय्या यांनी खुद्द केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अनिल परब यांनी रिसॉर्ट काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

काय म्हणालेत नेमकं सोमय्या

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधले. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम येणार असून, इडी, सीबीआय, आयकर विभाग, महसूल मंत्रालयकडे मी तक्रार केल्याचे सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे. दरम्यान सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या-त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असे अनिल परब यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः दोन ‘अनिल’ रडारवर, ठाकरे सरकार ‘गॅस’वर!)

परिवहन विभागातील बदल्यांचेही कागद सीबीआयच्या हातात?

काही दिवसांपूर्वी परिवहन विभागात बदल्यांचे घोटाळ्यांवर घोटाळे झाल्याची तक्रार किरिट सोमय्या यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सीबीआयकडे केली होती. परिवहन विभागातही एक सचिन वाझे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. सचिन वाझे हा बडे अधिकारी, काही सत्ताधा-यांसाठी खंडणी वसुलीचे काम करत होता. त्याच धर्तीवर बजरंग खरमाटे हा परिवहन विभागातील सचिन वाझे असल्याचा चिमटा किरीट सोमय्या यांनी काढला होता. तसेच सोमय्या यांनी असा दावा केला होता की, परिवहन विभागातील बदली रॅकेटबाबत त्यांच्याकडे एक तक्रार आलेली आहे. बदल्यांचे रेट २५ लाख, ५० लाख, एक कोटी की, आणखी किती? याबाबतची माहिती त्यात आहे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी राज्यपाल व सीबीआयकडे मागणी केली होती. सोमय्या यांच्या या मागणीवर सीबीआयने चौकशी सुरू केली असून, याचीही काही कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनिल परब देखील देशमुखांप्रमाणेच रडारवर येतील, असे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः परबांमुळे जुने-जाणते शिवसैनिक ‘मातोश्री’ला झाले ‘पोरके’?)

वाझेच्याही पत्रामुळे अनिल परब अडचणीत

सचिन वाझे याने स्वतःच्या हस्ताक्षरात एनआयएला पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील उल्लेख केला होता. जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर आपल्याला बोलावले होते. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी मला बोलावले. सुरुवातीला SBUT बद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितले होते. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUTकडून ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUT बद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपले कोणतेही नियंत्रण नव्हते, असे वाझे याने पत्रात म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.