अनिल परबांना हवा १४ दिवसांचा वेळ

माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही, त्यामुळे दोन आठवड्यांनंतरची वेळ देण्यात यावी.

84

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे सध्या ईडीच्या रडारवर असून, ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले, मात्र अनिल परब चौकशीला गेले नाहीत. त्यांनी याबाबतचे कारण पत्राद्वारे ईडी कार्यालयाला कळवले असून, हजर राहण्यासाठी आपल्याला १४ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. अनिल परब यांना मंगळवारी ‘ईडी’ने १०० कोटींच्या कथित वसुली संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

काय म्हणाले अनिल परब?

मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही, त्यामुळे दोन आठवड्यांनंतरची वेळ देण्यात यावी. मला पाठवलेल्या नोटीशीत कशा संदर्भात चौकशी करायची आहे, याचे कारण लिहिलेले नाही. त्यामुळे चौकशीचे कारण स्पष्ट करावे. तसे केल्यास मला चौकशीत योग्य ती माहिती देता येईल, असेही परब यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

(हेही वाचाः परबांना आलेल्या नोटीसचा शिवसेना नेत्यांनी घेतला धसका)

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात परब हजर

दुसरीकडे, राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायूवेग पथकांसाठी ७६ अत्याधुनिक वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी वितरण करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज तथा बंटी डी. पाटील, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.

लोकायुक्तांकडून चौकशी

परिवहन विभागात बदल्यांचे रॅकेट हाेते, ते परब यांच्या जवळचा अधिकारी बजरंग खारमेटे चालवत होता. याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्याची आता लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यासंदर्भात राज्यपाल यांनी मंगळवारी आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

(हेही वाचाः मंत्री अनिल परबांची पदोन्नती भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी! कुणी दिले आदेश?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.