‘तुम्हालाही सत्तेची नशा चढली आहे’, केजरीवालांना अण्णा हजारेंनी सुनावले

155

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहीत खडे बोल सुनावले आहेत. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणा-या अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यावर अण्णांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

आदर्श विचारसरणीचा विसर

मद्य धोरणावरुन हजारे यांनी केजरीवाल यांना सुनावले आहे. लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे आणि महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण तुमच्या सरकारने आणले आहे. तुमच्याकडून तमाम जनतेला फार अपेक्षा होत्या पण राजकारणात प्रवेश केल्यावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला आदर्श विचारसरणीचा विसर पडल्याचे दिसत आहे. दारुच्या नशेप्रमाणेच सत्तेचीही नशा असते. तुम्हालाही अशा सत्तेची गुंगी चढली आहे. म्हणूनच तुमच्या सरकारने दिल्लीत दारू धोरण तयार केले आहे. त्यामुळेच दिल्लीत मद्यपानाला चालना मिळू लागली आहे. ही गोष्ट जनतेच्या हिताची नसल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः पीएफआय सारख्या राष्ट्रविघातक शक्तींना काँग्रेसचे समर्थन, वीर सावरकर पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रणजित सावरकरांचा घणाघात)

असे धोरण आले नसते

तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात कमालीचा फरक दिसत आहे. 18 सप्टेंबर 2012 रोजी टीम अण्णाची दिल्ली येथे बैठक झाली, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्यावर भाष्य केले होते पण राजकीय पक्ष स्थापन करणं ही तुमची मूळ भूमिका कधीच नव्हती. टीम अण्णाबाबत जनतेच्या मनात एक वेगळा विश्वास निर्माण झाला होता. देशात लोकशिक्षण आणि जनजागृतीचे काम झाले असते तर दारुबाबत असे चुकीचे धोरण कधीही आले नसते, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी केजरीवालांना सुनावले आहे.

‘आप’ देखील इतर पक्षांप्रमाणेच वागतोय

कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी सरकारला कायम जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे होते. तसे झाले असते तर देशातील गरिबांना त्याचा फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे काहीही झाले नाही. तुम्हीही मनीष सिसोदिया आणि अन्य सहका-यांसह नवा पक्ष स्थापन केला. पण संपूर्ण देशात भ्रष्टाचारविरोधी ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करुन स्थापना झालेला पक्ष देखील आता इतर पक्षांप्रमाणेच वागू लागला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.