भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून मागील १७ महिन्यांपासून या नाट्यगृहाचे कान तिसऱ्या घंटेच्या आवाजासाठी आसूसलेले आहेत. मागील ३८वर्षांपूर्वी येथील खुल्या नाट्यगृहाचा पडदा पडला होता. आता खुले नाट्यगृह बंदिस्त उभे राहिल्यानंतर १७ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पण आधी ठाकरे सरकारला हे नाट्यगृह खुले करायला वेळ मिळाला नाही आणि आत्ताच्या शिंदे सरकारचे याकडे लक्ष देत नसल्याने लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आजही हे नाट्यगृह उपेक्षित अवस्थेत पडलेले पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांसहित कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा)
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे रशियाला गेले, परंतु त्यांना भायखळ्यात अण्णाभाऊ साठेंच्या नावाने उभ्या राहिलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण करून नाट्य निर्माते आणि नाट्य रसिकांसाठी ते खुले करून देण्यासाठी सरकार आणि महापालिका प्रशासन पुढाकार घेताना दिसत नाही.
भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हे मागील ३७ वर्षांपासून बंद आहे. १९६३ पासून लावणीसह भारुड आदी लोककलांच्या सादरीकरणासाठी या खुल्या रंगमंचाचा वापर केला जात असे. ४५० प्रेक्षकांसाठी खुले नाट्यगृह महापालिकेने सुरु केले होते. त्यावेळी मराठी लोककला सादर करण्यात येत होती.
परंतु राणीबागेतील प्राण्यांना या आवाजाचा त्रास होत असल्याने १९८४मध्ये ते बंद करण्यात आले. तेव्हापासून २००३पर्यंत हे नाट्यगृह पडिक स्थितीतच होते. त्यानंतर याच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव चर्चेला आला. सुरुवातील यासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. हा खर्च सरकार आणि महापालिका निम्मा निम्मा करणार होता. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही यासाठी सरकारच्या वाट्याला येणाऱ्या ५० टक्के रक्कम अर्थात ६ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये सरकारने यासाठी निधी देण्यास नकार दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१४मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. सुरुवातीला २० कोटी रुपयांचे काम प्रस्तावित होते, परंतु आता प्रत्यक्षात ही वास्तू उभी राही पर्यंत त्यावरील खर्च हा ३५ कोटींच्या आसपास पोहोचला आहे.
परंतु आता तब्बल ३८ वर्षांनंतर हे खुले नाट्यगृह आता बंदिस्त स्थितीत ७५० आसन क्षमतेचे दिमाखात उभे आहे. मागील एप्रिल २०२१ महिन्यापासून हे नाट्यगृह लोकार्पणाच्या प्रतीक्षेत उभे आहे. दरम्यान कोविडचे निर्बंध उठवल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन या नाट्यगृहात केले होते. त्यावेळी पहिल्याच सर्वसाधारण बैठकीत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला होता आणि यांच्या दोन्ही गटांनी तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवल्या होत्या.
महापालिकेच्या सभा घेण्यात आल्याने यासाठी प्रशासनाने अग्निशमन दल तसेच इतर परवानगी तातडीने मिळवल्या. तसेच नाट्य निर्माते यांनी सुचवलेल्या काही तर त्रुटीही दूर करण्यात आल्या तरीही याचे लोकार्पण करून नाट्य रसिक आणि निर्माते यांना हे नाट्यगृह खुले करून दिले जात नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अभियंता दिवसाचा कार्यक्रम याच नाट्य गृहात आयोजित करण्याचा विचार अभियंता संघटनेचा होता, परंतु आयुक्तांनी केवळ याचे लोकार्पण न झाल्याने त्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यास नकार दिला. त्यामुळे आधीच हे नाट्यगृह उभे राहायला ३८ वर्षे उजाडली आणि हे नाट्य गृह खुले व्हायला १७ महिने निघून गेले. त्यामुळे अजून किती दिवस हे नाट्यगृह खुले न करता पुन्हा पडीक बनवले जाणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community