भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून मागील दीड वर्षांपासून हे नाट्यगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मागील ३८ वर्षांपूर्वी येथील खुल्या नाट्यगृहाचा पडदा पडला होता. आता खुले नाट्यगृह बंदिस्त उभे राहिल्यानंतर १८ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पण आधी ठाकरे सरकारला हे नाट्यगृह खुले करायला वेळ मिळाला नाही आणि आत्ताच्या शिंदे सरकारचे याकडे लक्ष देत नसल्याने लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आजही हे नाट्यगृह उपेक्षित अवस्थेत पडलेले पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अण्णाभाऊ साठे यांची जयंती काही दिवसांपूर्वी पार पडली, या दिनाचे औचित्य साधून हे महापालिका आयुक्त व प्रशासक यांना मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या वास्तूचे लोकार्पण करता आले असते. परंतु या महापालिका आयुक्तांना हे नाट्यगृह खुले करण्याची इच्छा नाही. सरकारलाही महापालिकेला याचे लोकार्पण करण्यासाठी वेळ देण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे अण्णाभाऊ प्रमाणेच आता त्यांच्या नावाचे नाट्यगृहही उपेक्षितच असे पडल्याचे पहायला मिळत आहे.
नाट्यगृह लोकार्पणाच्या प्रतीक्षेत उभे
भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हे मागील ३७ वर्षांपासून बंद आहे. १९६३ पासून लावणीसह भारुड आदी लोककलांच्या सादरीकरणासाठी या खुल्या रंगमंचाचा वापर केला जात असे. ४५० प्रेक्षकांसाठी खुले नाट्यगृह महापालिकेने सुरु केले होते. त्यावेळी मराठी लोककला सादर करण्यात येत होती. परंतु राणीबागेतील प्राण्यांना या आवाजाचा त्रास होत असल्याने १९८४मध्ये ते बंद करण्यात आले. तेव्हापासून २००३पर्यंत हे नाट्यगृह पडिक स्थितीतच होते. त्यानंतर याच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव चर्चेला आला. सुरुवातीला यासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. हा खर्च सरकार आणि महापालिका निम्मा निम्मा करणार होता. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही यासाठी सरकारच्या वाट्याला येणाऱ्या ५० टक्के रक्कम अर्थात ६ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये सरकारने यासाठी निधी देण्यास नकार दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१४मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. सुरुवातीला २० कोटी रुपयांचे काम प्रस्तावित होते, परंतु आता प्रत्यक्षात ही वास्तू उभी राही पर्यंत त्यावरील खर्च हा ३५ कोटींच्या आसपास पोहोचला आहे. परंतु आता तब्बल ३८ वर्षांनंतर हे खुले नाट्यगृह आता बंदिस्त स्थितीत ७५० आसन क्षमतेचे दिमाखात उभे आहे. मागील एप्रिल २०२१ महिन्यापासून हे नाट्यगृह लोकार्पणाच्या प्रतीक्षेत उभे आहे.
Join Our WhatsApp Community