देशाच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडींच्या चर्चा सर्वांच्या नजरा वळवताना दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयनांतर शिवसेना हे पक्षाचे नाव आणि मूळ चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असतानाच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटाने विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे. भरत गोगावले, सदा सरवणकर यांची यावेळी उपस्थिती होती. अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची भेट शिवसेना नेते भरत गोगावले आणि सदा सरवणकर यांनी घेतली होती. या भेटीत विधीमंडळातील कार्यालय आम्हाला द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. अर्थातच, केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्याने, विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडे देण्यात आला आहे.
( हेही वाचा: तो दिवस दूर नाही, प्रवाशी ड्रोनने विमानतळावर जातील; नितीन गडकरी यांचे वक्तव्य )
कार्यालय ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले . त्यानंतर सोमवारी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे. याआधी ठाकरे गटाचा या कार्यालयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले आहेत. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटले की आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्याल ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहोत.
महापालिकेचे कार्यालय मिळावे म्हणून आयुक्तांची घेणार भेट
दरम्यान, मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे पक्ष कार्यालय महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सील केले होते आणि याबरोबरच इतर पक्षांची कार्यालयेही सील करण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता देत, धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर आता या शिवसेनेने महापालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा पुन्हा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालय परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या शिवसेनेचे शिष्टमंडळ आज आयुक्तांना भेटून हे पक्षकार्यालय आम्हाला मिळावे आणि उघडून द्यावे, याची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community