सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमधील आणखी एक गलथानपणा समोर

आयुक्त नक्की कुणाच्या सांगण्यावरुन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करताना, त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवतात?

मुंबई महापालिकेच्या सहा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करताना प्रशासनाने आपल्या गलथान कारभारात पुन्हा एकदा भर घातली आहे. सहा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्यानंतर, महापालिका आयुक्तांनी तीन सहाय्यक आयुक्तांवर अतिरिक्त कारभाराची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये नवख्या असलेल्या मृदुला अंडे यांना दहिसरच्या आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा भार सोपवल्यानंतर, त्यांच्यावर बाजूच्या बोरीवली या आर-मध्य विभागाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे मुंबई रत्न पुरस्कार विजेते आयुक्त नक्की कुणाच्या सांगण्यावरुन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करताना, त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवतात, असा प्रश्न आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होताना दिसत आहे.

मोटे यांच्यावर अतिरिक्त कार्यभार

दोन दिवसांपूर्वी सहा सहाय्यक आयुक्तांची बदली करताना, चार सहाय्यक आयुक्तांच्या रिक्तपदावर कार्यकारी अभियंत्यांना नेमून, त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त असलेल्या विश्वास मोटे यांना करनिर्धारण व संकलन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. मोटे यांच्यावर वेगळ्या प्रकारचा शिक्का मारत त्यांच्याकडील विभागीय जबाबदारी काढून घेत प्रशासकीय जबाबदारी सोपवण्याच्या दृष्टीकोनातून करनिर्धारण व संकलन विभाग सोपवण्यात आले होते. परंतु आता त्याच मोटे यांच्यावर एम-पश्चिम विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेच्या सहा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, चार कार्यकारी अभियंत्यांना बढती)

विशेष म्हणजे एम-पश्चिम सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार कार्यकारी अभियंता सुरेश सागर यांच्यावर सोपवण्यात आला होता. परंतु दोनच दिवसांमध्ये त्यांच्याकडील जबाबदारी काढून मोटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यावर नियोजन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

तोकडा अनुभव असताना जबाबदारी

त्यातच गंमत म्हणजे आजवर कोणत्याही प्रशासकीय विभागात काम न केलेल्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची दहिसरच्या आर-उत्तर विभागाच्या रिक्तपदी बदली करण्यात आली. परंतु अगदी नवख्या असलेल्या अंडे यांच्यावरच आता बोरीवलीच्या आर-मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आधीच त्यांना विभागातील भौगोलिक रचनेची माहिती नाही. विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेले नाही. त्यामुळे आता प्रथमच त्या आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय विभागातील कामाचा तोकडा अनुभव असतानाही त्यांच्यावर आर-मध्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली.

(हेही वाचाः राजकीय सोयींसाठीच सहायक आयुक्तांच्या बदल्या!)

आर-मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या रिक्त जागेवर कोणालाही नेमलेले नाही. पण तिथे जर कोणा सहाय्यक आयुक्ताला नेमले जाणार असेल, तर त्याला किमान अनुभव तरी असावा. प्रशासनाला या विभागाची सोय म्हणून आर-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर हा अतिरिक्त कार्यभार सोपवता आला असता. परंतु पुन्हा एकदा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमध्ये गलथानपणाचे दर्शन प्रशासनाने दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here