राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. तसर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. खुद्द मंत्रालयातही ओमायक्रॉनचा प्रवेश झाला आहे. त्यातच एका मागोमाग एक मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकारमधील मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि प्राजक्त तनपुरे यांच्यापाठोपाठ आता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विरोधी पक्षात राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
(हेही वाचा नारायण राणे म्हणतात, आता लक्ष्य महाराष्ट्र!)
सरकारच्या चिंतेत भर
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे. नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले. यात वरील सर्व मंत्री आणि आमदार अधिवेशनाला उपस्थित होते. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देखील लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. रुग्ण दुपटीचा वेग लक्षात घेता राज्यात पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण होऊ शकते असेही विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community