उद्धवसेनेतील आणखी एका आमदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस

86

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आणखी एका आमदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस पाठविली आहे. उद्धवसेनेचे अकोल्याचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

( हेही वाचा : मनसेच्या ‘घे भरारी’ अभियानाच्या शुभारंभालाच मनसैनिकांची पाठ)

सुरुवातीला शिंदे गटासोबत गेलेले नितीन देशमुख हे गुवाहाटीतून माघारी परतले होते. त्यामुळे ते विशेष चर्चेत आले होते. देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली आहे. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ”मालमत्तेबाबत १७ जानेवारी रोजी जबाब नोंदविण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली आहे. तक्रार कुणाची आहे, तक्रारदाराचे नेमके काय म्हणणे आहे, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नोटीशीत दिलेले नाही. आमदाराला नोटीस देताना तक्रारदाराचे साधे नाव देखील दिलेले नाही. १७ तारखेला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन मीडियाला याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेन. भास्कर जाधव अधिवेशनात बोलले, लगेच त्यांना नोटीस आली. मलाही आता नोटीस आली आहे. ईडीची नोटीस आली तरी मी घाबरणार नाही. माझ्याकडे चुकीची मालमत्ता नाही”, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मला एसीबीच्या कार्यालयातून एक फोन आला होता. तुमची एसीबी कार्यालयात तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यामुळे एकदा वर जाऊन संपर्क साधावा. आता वर जाऊन म्हणजे नेमके कुणाला भेटावे, हे मला आणि सर्वांनाच कळलेले आहे. पण मी काही संपर्क करणार नाही. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे आणि राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

एकेकाळी होते शिंदेंच्या जवळ

नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जायचे. शिंदे यांच्यासोबत सूरतला गेल्यानंतर देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. प्रकृती खालावल्यामुळे नितीन देशमुख यांना सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते गुवाहाटीला पोहोचले. मात्र मधूनच काही कारणास्तव ते खासगी विमानाने महाराष्ट्रात आले. यावेळी ते खासगी विमान खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिले असल्याचेही सांगण्यात आले होते. तेव्हापासून नितीन देशमुख हे ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.