नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसमध्ये तांबे-थोरात विरुद्ध पटोले असा वाद चव्हाट्यावर. सत्यजीत तांबे यांचा या निवडणुकीत विजय झाल्यानंतर काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले होते. तांबे-थोरात विरुद्ध पटोले वादाचे पडसाद थेट दिल्ली दरबारी हायकमांडपर्यंत उमटले आहेत. दरम्यान आता नाना पटोलेंविरोधातील वाद पुन्हा उफाळला असून असंतुष्ट गटाने पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्ली गाठली आहे.
माहितीनुसार, मराठवाड्यातील नाना पटोलेंविरोधातील असंतुष्ट गट शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वेणूगोपाल यांची भेट घेणार आहेत. या गटामध्ये काँग्रेसचे २ माजी खासदार, ४ माजी आमदारांसह एक शिष्टमंडळ आहे. या भेटीदरम्यान नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर येत्या काळात काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? आणि पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान यापूर्वी थोरात यांनी पटोलेंविरोधात लिहिलेल्या पत्राची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली होती. काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि याचा अंतिम अहवाल २६ फेब्रुवारीला रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात खर्गे यांच्याकडे सादर केला होता.
(हेही वाचा – राहुला गांधींना हक्कभंगाची नोटीस; आज विशेषाधिकार समितीपुढे हजर रहावे लागणार)
Join Our WhatsApp Community