एकीकडे राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरु होत असून देशभरातील हिंदू एक होताना दिसत आहेत. असे असताना हिंदूंमध्ये जातीभेदाचे विष पेरून मराठा (Maratha) विरुद्ध ओबीसी (OBC) असा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अज्ञात शक्तींकडून (Invisible forces) होऊ शकतो. मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या आडून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशविघातक शक्तींकडून अराजक माजवण्याचा किंवा जातीय दंगली घडवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
जरांगेचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. आज त्यांनी समाजाला आवाहन करीत ट्रॅक्टर (Tractor), बैलगाड्यांसह (Bullock cart) आणि चालत (walk) मुंबई गाठावी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही अशी भाषा केली. त्याचबरोबर तीन कोटी मराठा या आंदोलनासाठी मुंबईत येतील, असेही त्यांनी सांगितले. “देशात असं आंदोलन कधी झाले नाही असे आंदोलन होईल,” असे सांगत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की, “पोलिसांनी ट्रॅक्टर आणि गाड्या मुंबईत येण्यापासून अडवण्याच्या भानगडीत पडू नये. सरकारने वेगळं वळण या आंदोलनाला लागू देऊ नये,” असेही पाटील म्हणाले.
कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाची आठवण
दोन वर्षांपूर्वी कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकरी नेते राकेश टीकैत यांच्या नेतृत्वाखाली असेच आंदोलन झाले. त्यावेळीही अशीच भाषा करीत सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हाही २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावल्याच्या खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरवून अराजक माजवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सुदैवाने पोलिसांनी तो डाव हाणून पडला. असाच धोका मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation) आडून होऊ शकतो यासाठी मराठा समाजाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
गर्दीचा फायदा देशविघातक शक्तींनी घेऊ नये
आता २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा होत आहे. या निमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध धार्मिक (Religious) कार्यक्रम होणार. याचदरम्यान मुंबईत लाखो मराठा कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात होईल, रस्ते गर्दीने तुडुंब भरून वाहू लागतील आणि याचा फायदा देशविघातक शक्ती घेऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.
(हेही वाचा २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार; Manoj Jarange Patil यांची घोषणा)
यंत्रणांवर ताण येणार
या आंदोलनाचे तीव्र पडसाद मुंबईच्या यंत्रणांवर ताण पडून, दैनंदिन जीवनावर होणार हे स्पष्टच आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, रेल्वे प्रवासी संख्या, रहदारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सामान्य मुंबईकरांमध्ये होताना दिसते. या आंदोलनाला वेगळे वळण लागू नये, याची काळजी मुंबई पोलिसांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
जमावबंदी वाढणार
एक नवा आदेश काढत पोलिसांनी सध्या सुरु असलेली जमावबंदी १८ जानेवारीपर्यंत पुढील आदेश जारी करेपर्यंत सुरूच राहिल असे स्पष्ट केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण लक्षात घेऊन १८ जानेवारपर्यंत नवा आदेश काढून जमावबंदी पुन्हा पुढे वाढविण्यात येईल. दक्षिण मुंबई, आझाद मैदानात सुरक्षा वाढवण्यात येईल.
पोलीस ‘अलर्ट मोड’वर
पोलिसांनी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायको-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्डग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डाणक्रीयांना मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेशही काढले आहेत.
Join Our WhatsApp Community