राज्यात ज्यांची तीन वर्षे सत्ता होती ते आज टीका करत आहेत. तीन वर्षे मातोश्रीचे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी बंद होते ते आज बोलत आहेत. सत्तेत होते तेव्हा ते काय करत होते? आयएन विक्रांतच्या वेळी का बोलले नाहीत? तेव्हा त्यांचे ट्विटर कुठे होते? सत्तेपासून दूर गेल्याने विरोधक पाण्याविना असलेल्या माशासारखे फडफडू लागले आहेत, असा हल्लाबोल यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला. मंत्री ठाकूर हे सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला.
( हेही वाचा : परेल पुलाचीही डागडुजी, होणार का पुलकोंडी)
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “मी आज दक्षिणमध्य मुंबई लोकसभा क्षेत्रात फिरत आहे. पक्ष मजबूत करणे, पक्षासोबत लोकांना जोडणे यासाठी हे दौरे आहेत. या आधी मी कल्याण दौरा केला, शासकीय अधिकाऱ्यांशी बोललो. केंद्राच्या योजनांसोबत राज्यातील योजना देखील लागू करा असे मी, त्यावेळी अधिकाऱ्यांना सांगीतले. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलून भाजपा कशी मजबूत होईल याबाबत चर्चा झाली. लाभार्थ्यांसोबत देखील आम्ही चर्चा केली. ४० वर्ष ज्यांना शौचालयासाठी बाहेर जावं लागत होतं त्यांना आता शौचालय मिळालं आहे. मागील आठ वर्षे गरिबांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने काम केले आहे. भाजपने जे सांगितले ते करून दाखवले, मग ते राम मंदिर असो किंवा कलम ३७०. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे लोकप्रिय नेते आहेत, असे गौरोद्गार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काढले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, राजेश शिरवाडकर, श्वेता परुळकर, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community