Shivaji Park वर अखेरच्या रविवारी प्रचारसभेसाठी चार पक्षांचे अर्ज

122
Shivaji Park वर अखेरच्या रविवारी प्रचारसभेसाठी चार पक्षांचे अर्ज

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकीय पक्षांच्या तयारीला आणखीनच वेग आला. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदान प्रचारसभेसाठी चार प्रमुख पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उबाठा), शिवसेना, भाजपा आणि मनसे या पक्षांनी १७ नोव्हेंबर रोजी प्रचारासाठी अर्ज दाखल केला आहे. मनसेने सर्वांत आधी अर्ज केल्याने त्यांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणुका जाहीर होताच अनेक पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन नेत्यांकडून केले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर रोजी थंडावतील. त्याआधी १७ नोव्हेंबर रोजी शेवटचा रविवार आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या सभा पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानासाठी चार पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या चारही पक्षांकडून १७ नोव्हेंबरसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Wayanad By Election : सत्यन मोकेरी यांच्यामुळे वायनाडचा गड प्रियंका गांधींना अवघड जाणार का?)

दरम्यान या मैदानासाठी सर्वांत पहिल्यांदा अर्ज मनसेकडून आला आहे. त्यामुळे मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावत आहेत. त्यामुळे १७ नोव्हेंबरला संध्याकाळी सभा घेण्यासाठी आम्ही शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदान आरक्षित करण्यासाठी अर्ज दिला आहे. १७ नोव्हेंबरला इतर तीन पक्षांनी देखील महापालिकेकडे अर्ज केला आहे. जेव्हा एकाच दिवसासाठी आणि एकाच ठिकाणासाठी अनेक पक्ष अर्ज देतात, तेव्हा प्रथम अर्ज देणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते आणि आमचा अर्ज सर्वात प्रथम देण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आमचा अर्ज पहिला आलेला आहे. त्यामुळे हे मैदान सभेसाठी आम्हालाच मिळणार, असा विश्वास किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे.

शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदान हे मुंबईचे मध्यवर्ती मैदान असून याला ऐतिहासिक वारसा आहे. या मैदानाचा राजकीय वारसा बाळासाहेबांमुळे तयार झाला आहे, तो मान्य करावा लागेल. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेचा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रावर पडतो. त्यामुळे सर्वच पक्षांना असं वाटतं की, आपली सभा शिवाजी पार्क मैदानात झाली पाहिजे, असेही किल्लेदार म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.