पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या; दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा?

122

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन ६० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे नवोदीत मंत्र्यांच्या गोटात चलबिचलता असून, विशेषतः औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.

( हेही वाचा : बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! SBI अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज)

महाविकास आघाडी सरकारने पालकमंत्री नेमताना जिल्हाबदलाचे तंत्र वापरले होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. शिंदे-फडणवीस असा निर्णय घेण्याची शक्यता नसली, तरी औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नेमताना त्यांना तारेवरची कसरत पार करावी लागणार आहे. औरंगाबादमधून अतुल सावे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. या तिघांनाही पालकमंत्री होण्याचे वेध लागले आहेत.

दुसरीकडे संजय शिरसाट यांची कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्रीपदावर बोळवण केल्यास ते औरंगाबादच्या पालकमंत्री पदावर दावा सांगण्याच्या तयारीत आहेत. जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन अशा दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. गुलाबराव पाटलांकडे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते असल्याने पालकमंत्रीपदासाठी ते आग्रही आहेत. मात्र, स्वपक्षीयांसह अपक्ष आमदारांची नाराजी, मंत्रिपदांचा पेच लक्षात घेता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार नाहीत, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

भाजप औरंगाबादसाठी आग्रही

ध्वजारोहणासाठी औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, विभागीय स्तरावरील मोठ्या जिल्ह्यांतील विकास वेग लक्षात घेता औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपकडे असावी, असे वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यामुळे अतुल सावे यांचे पारडे तुलनेने जड दिसत आहे. तसे झाल्यास शिवसेनेच्या मंत्र्यांना परभणी आणि जालना जिल्ह्यात समाधान मानावे लागणार आहे.

फडणवीसांचे पुण्याकडे लक्ष

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याकडे जातीने लक्ष देत आहेत. बारामती या पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी फडणवीसांनी पुण्याचे पालकमंत्रीपद सांभाळावे, अशी वरिष्ठ नेतृत्त्वाची मनिषा आहे. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.