लखीमपूर खेरी येथे झालेल्या हत्याकांडाचा निषेध करणा-या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. त्यावरुन सामनाच्या अग्रलेखात केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. प्रियंका गांधींची तुलना त्यांच्या आजी इंदिरा गांधींशी करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
प्रियंका गांधींची अटक बेकायदेशीर
प्रियंका गांधींना योगी सरकारने अटक केली. त्याआधी 36 तास त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. ज्या घाणेरड्या ठिकाणी त्यांना नजरकैदेत ठेवले तेथे प्रियंका गांधी झाडू मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून राजकीय हल्ले होऊ शकतात. पण देशासाठी असीम त्याग करणा-या व पाकिस्तानचे तुकडे करुन हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणा-या महान इंदिरा गांधींच्या त्या नात आहेत याचे भान त्यांना बेकायदेशीररित्या कैद करणा-यांनी ठेवायला हवे होते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
(हेही वाचाः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की ‘रक्त महोत्सव?’ सामनातून केंद्र सरकारवर आगपखड)
त्या लढाऊ आणि झुंजार
प्रियंका गांधी या लखीमपूर खेरीत सर्वात आधी पोहोचल्या. चिरडून मारलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाला त्यांना भेटायचे होते. प्रशासनाने केवळ त्यांना रोखले नाही, तर त्यांना धक्काबुक्की करत गाडीत कोंबले. पण त्या लढाऊ आणि झुंजार आहेत. त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार आहे, अशा शब्दांत सामनातून प्रियंका गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे.
…तर भाजपाच्या महिला फौजेने फुगड्या घातल्या असत्या
प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करुन धक्के मारले हे भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते, तर महाराष्ट्रातील भाजपाची महिला फौज फुगड्या घालत रस्त्यावर उतरली असती. महिलांवर अत्याचाराची स्वतंत्र व्याख्या भाजपाने केली असून त्यात इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाही, अशी जळजळीत टीका देखील राज्यातील भाजपाच्या महिला नेत्यांवर सामनातून करण्यात आली आहे.
(हेही वाचाः धक्कादायक! लखीमपूरमध्येही खलिस्तान्यांचा सहभाग?)
Join Our WhatsApp Community