भाजपाचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात २ हजार २२६ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गाच्या टोलपासून आमदार-खासदारांचीही सुटका नाही )
इस्लामपूर धरणातून जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील २१ गावे, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील ५३, तसेच संग्रामपूर तालुक्यातील ३० अशा एकूण १०४ गावांतील २५ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ८ हजार २४९ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यातील १७ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. या प्रकल्पासाठी ५९७ हेक्टर जागेपैकी ४५८ हेक्टर भूसंपादन झाले आहे. माती धरणाचे काम ६८ टक्के पूर्ण झाले असून, कमांड इरियामध्ये ५ हजार १६२ शेततळी देखील घेण्यात येणार आहेत.
‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला ५० कोटींचा निधी
- पुण्याच्या हवेली तालुक्यातील आंबेगाव बु. येथे साकारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’प्रकल्पास 50 कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून अनुदान देण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
- आंबेगांव येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवसृष्टी प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग व घटना आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा परिचय करुन देणारी मांडणी करण्यात येणार आहे.
- या प्रकल्पात प्रतापगडावरील भवानीमाता स्मारक, माची, रायगडावरील बाजारपेठ, रायगड किल्ल्याचा देखावा राजगडावरील राजसभा, पाली दरवाजा प्रतिकृती, खान्देरी व पन्हाळा लढाई देखावा, याशिवाय अँम्फिथियटर, प्रशासकीय इमारत-सरकारवाडा अनुषांगिक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
- मूळ प्रकल्प ४३८ कोटी ६८ लाख रुपयांचा आहे. यातून ३०० हून अधिक जणांना रोजगार मिळेल.