शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावरही साखर कारखान्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. जरंडेश्वर साखर कारखान्याप्रमाणे खोतकर यांनीही त्यांचा साखर कारखाना तोट्यात गेल्याचे दाखवले आणि नातलगांच्या माध्यमातून विकतही घेतला, विशेष म्हणजे या कारखान्याच्या विश्वस्त पदावर मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी असल्याने नांगरे पाटीलही गोत्यात आले आहेत.
खोतकरांचा कारखाना खोतकरांनीच घेतला
आपण अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. खोतकरांनी या घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी आपल्याकडे त्याविषयीची कागदपत्रे आहेत, असे सांगत फेब्रुवारी 2012 ला जालना सहकारी साखर कारखाना आजारी पडला. अर्जुन खोतकर यांनी 2018 ला अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची स्थापना केली. कारखाना विकण्यासाठी 28 फेब्रुवारीला टेंडर निघाले. ती निविदा तापडिया कंपनीच्या नावाने दिली गेली. या कंपनीने कारखाना 42 कोटी 18 लाख 62 हजारांत विकत घेतला. 10 जुलै 2020 रोजी तापडिया कंपनीने मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र दिले, त्यात त्यांनी हे पैसे अर्जुन खोतकर यांनी दिल्याचे सांगितले. जरंडेश्वर कारखान्याविषयी जे अजित पवारांनी केले तेच खोतकरांनी केले आहे. यात 6 शेअर होल्डर आहेत. 6 पैकी 5 जण खोतकरांच्या परिवारातील आहेत. जालना साखर कारखान्यांचे दोन मालक आहेत. अर्जुन खोतकर, पद्माकर मुळे आणि दुसरे नाव रुपाली विश्वास नांगरे-पाटील, हे आहे.
(हेही वाचा एसटीच्या विलीनीकरणावर सरकार महाधिवक्त्यांशी चर्चा करणार!)
सीबीआय चौकशीची मागणी
अर्जुन खोतकरांच्या या साखर कारखान्याची चौकशी बंद केली गेली. मुंबई पोलिसांनी चौकशी बंद करून रिपोर्ट न्यायालयाला दिला. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली. विश्वास नागरे-पाटीलांचे सासरे आणि अर्जुन खोतकर 950 कोटींचे मालक आहेत. त्यांनी हा कारखाना बेनामी पद्धतीने का विकत घेतला?, असा सवाल त्यांनी केला. या अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची चौकशी करण्यासाठी आपण सोमवारी दिल्लीला जाणार आहे. ईडीचे अधिकारी, सहकार मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच नांगरे-पाटील यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरून दूर करावे, अशीही मागणी सोमय्या यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community