तवांग परिसरात सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींबाबत अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले असून, हा १९६२चा नव्हे; तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भारत आहे, हे ध्यानात घ्या, असा गर्भित इशाराही दिला आहे. १९४०च्या शिमला करारानुसार चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा पूर्णतः खोटा आहे. त्यांना जशासतसे प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : पोलीस भरतीसाठी ४५ तृतीयपंथीयांचे अर्ज दाखल)
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘माय होम इंडिया’ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘वन इंडिया’ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुरस्कारार्थी तेचि गुबीन, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर, पद्मश्री अनुराधा पौडवाल, डॉ. हरिश शेट्टी, रमेश पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते. पेमा खांडू पुढे म्हणाले की, मी अरुणाचल प्रदेशचा मुख्यमंत्री आहेच, पण तवांगच्या ज्या यांगसे सेक्टरमध्ये भारत-चीन सैन्यात संघर्ष झाला, तिथला आमदारही आहे. त्यामुळे ज्या अर्थी मी मुंबईतील कार्यक्रमात सहभागी झालो, त्याअर्थी तिकडे सगळे काही सुरळीत आहे. पण, माध्यमांमध्ये मसाला लावून बातम्या चालवल्या जात आहेत. त्यांना माझी माध्यमांना विनंती आहे की, संवेदनशील विषय हाताळताना जबाबदारीचे भान बाळगा.
काँग्रेसच्या सत्ताकाळात यांगसे सेक्टरमध्ये १ मेजर आणि १६ जवान तैनात असायचे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी इथल्या प्रत्येक संवेदनशील भागात पूर्ण बटालियन (१ हजार सैन्य) तैनात करण्याचा निर्णय घेतला. तब्बल १६ हजार मीटरच्या उंचीवर हे सैनिक जागता पहारा देत आहेत. त्यामुळे भारताच्या उत्तर पूर्वेकडील सीमा अधिक सुरक्षीत झाल्या आहेत. सीमासंघर्ष सतत चिघळवत ठेवणाऱ्यांना मी इतकेच सांगू इच्छितो की, आम्ही कुणाच्या क्षेत्रात घुसखोरी करणार नाही, पण इतरांना घुसखोरी करूही देणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा इशाराही खांडू यांनी दिला.
चीनचा दावा खोटा!
चीन अरुणाचल प्रदेशवर जो दावा सांगत आहे, तो पूर्णतः चुकीचा आहे. १९४०च्या शिमला करारानुसार मॅकमोहन लाईनवरील अरूणाचल प्रदेशचा तवांग भाग भारताशी जोडला गेलेला आहे. तवांग अरुणाचल प्रदेशला जोडण्याचे श्रेय वल्लभ भाई पटेल यांना जाते. पण, आम्हाला खरा इतिहास शिकवला गेलाच नाही, हे दुर्देव असल्याचेही पेमा खांडू म्हणाले. इंग्रज आणि चीनशी उत्तर पूर्वेतील जनतेने वेळोवेळी लढा दिला. पण इतिहासात त्याची कुठेही नोंद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुर्लक्षित स्वतंत्र सेनानींना ओळख देण्याचा जो विडा उचलला आहे, त्यातून हे खरे हिरो समोर येत आहेत, असेही ते म्हणाले.
मोदींनी उत्तर पूर्वेकडील राज्यांना दिशा दिली
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मागच्या आठ वर्षांत उत्तर पूर्वेकडील राज्यांत जी कामे झाली, तितकी स्वातंत्र्यानंतर कधीच झाली नाहीत. याआधीच्या सरकारांमध्ये १० वर्षांतून एकदा पंतप्रधान उत्तर पूर्वेला यायचे. केंद्रीय मंत्री तर गुवाहाटीच्या पुढे जात नसायचे. पण मोदी आल्यापासून चित्र बदलले आहे. आता १५ दिवसांतून एकदा केंद्रीय मंत्री उत्तर पूर्वेकडील राज्यांचा दौरा करतात. त्यामुळे पायाभूत सुविधा, उद्योग विकसित झाले आहेत. पंतप्रधान मोदी मागच्या आठ वर्षांत १६ वेळा उत्तर पूर्व राज्यांत आले. हा एक विक्रम आहे. याआधी भ्रष्ट्राचार, अमली पदार्थ, वाईट व्यवसायांसाठी आम्ही ओळखले जात होतो. पण मोदींनी चित्र बदलले. आव्हानांचे रूपांतर त्यांनी संधीत केले. याआधीच्या राज्यकर्त्यांनी त्या संधी ओळखल्याच नाहीत, असेही पेमा खांडू म्हणाले.
Join Our WhatsApp Community