‘मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनपेक्षित घटना घडल्या. काहींनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची, निवडणूक चिन्हाची चोरी केली. पण मी एकच सांगेन की, उद्धव यांचे वडील सिंह होते आणि ते सिंहाचे छावे आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे’, अशी साखरपेरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्री भेटीदरम्यान केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट म्हणजे नव्या आघाडीचे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा आणि आम आदमी पक्षाचे नेते उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अरविंद केजरीवाल माझ्या भेटीसाठी का आले आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने संपर्क केला जात आहे. देशाला मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज सगळेजण बोलून दाखवत आहे. भविष्यात त्यादिशेने पावले पडलेली दिसतील, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’)
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी केजरीवाल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, देशात एकमेव पक्ष आहे, जो २४ तास निवडणुकांचा विचार करतो. आम्ही देशाचा विचार करणारी माणसे आहोत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही राजकीय मुद्द्यांवर चर्चा करू. मागच्या दिवसांत महाराष्ट्रात गंभीर घटना घडल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची, निवडणूक चिन्हाची चोरी झाली. पण संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळेल, अशी मला आशा आहे. येत्या सर्व निवडणुकांत ते बाजी मारतील. ईडी, सीबीआय आणि अन्य यंत्रणांचा वापर डरपोक लोक करतात. कारण ते आम्हाला घाबरतात. त्यांना करूद्या. शेवटी विजय सत्याचा होतो, असेही केजरीवाल म्हणाले.
कोरोनाकाळात महाराष्ट्राचे अनुकरण केले
- मातोश्रीवरील भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंशी आमची बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. त्यांना भेटायची खूप दिवसांची इच्छा होती. कोरोनाकाळात महाराष्ट्रात त्यांच्या सरकारने चांगले काम केले. दिल्लीतील लोकांनी याकाळात मुंबई आणि महाराष्ट्राकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या, त्याचे अनुकरण केले. त्यांनी राबविलेल्या उपाययोजना आम्ही अंगिकारल्या.
- देशातील सध्याच्या गंभीर परिस्थितीवर आमच्यात प्रामुख्याने चर्चा झाली. देशातील युवावर्ग बेरोजगारीने पूर्णतः त्रस्त आहे. सत्तेत येताना युवकांना मोठमोठी आश्वासने त्यांनी दिली. २ कोटी नोकऱ्या देऊ, अमूक करू…; पण ती आश्वासने हवेत विरली. महागाई इतकी वाढली आहे की, लोकांना घरखर्च भागविताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. काही उद्योगपतींना लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार देशाला दावणीला बांधत आहे. सरकारी संस्थांची विक्री केली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.