दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मालीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, जेव्हापासून त्यांनी DCW चे अध्यक्षपद सोडले तेव्हापासून आयोगाकडून भेदभाव केला जात आहे. केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात मालीवाल यांनी म्हटले आहे की, आयोगाच्या एकाही सदस्याला गेल्या ६ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही आणि त्याचे बजेटही कमी करण्यात आले आहे. या पत्राची माहिती स्वतः स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून दिली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राज्यसभा खासदार झालेल्या स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटद्वारे दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून दिल्ली सरकारच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आयोगाविरोधात आघाडी उघडली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून कुणालाही पगार मिळालेला नाही आणि बजेटमध्येही 28.5 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, अध्यक्ष आणि 2 सदस्यांची पदे भरण्यासाठी कोणतेही काम झालेले नाही. मी गेल्यापासून महिला आयोगाला पुन्हा कमकुवत संस्था बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्वाती मालीवाल यांनी पत्रात काय लिहिले?
स्वाती मालीवाल यांनी यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, 2015 पासून मी एवढ्या मेहनतीने उभारलेल्या यंत्रणांना सरकार नष्ट करू इच्छित आहे हे अत्यंत खेदजनक आहे. याशिवाय स्वाती मालीवाल यांनी आयोगाच्या कामांचाही आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. एकूण 4 पानांच्या पत्रात स्वाती मालीवाल यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर सविस्तर माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) अडचणीत सापडले होते.
Join Our WhatsApp Community