सध्या काश्मीर फाईल्स चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने या चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात असल्याने याचे राजकरणही मोठ्या स्तरावर होत आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळापासून ते दिल्लीच्या विधीमंडळापर्यंत आणि थेट संसदेपर्यंत या चित्रपटाची चर्चाच ऐकायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधीमंडळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून भाजपसह केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसूख घेतले. याबाबतच्या भाषणांचे व्हिडीओ समाजमाध्यमातून व्हायरल होत असून शिवसेनेच्यावतीने हे व्हीडीओ व्हायरल केले जात आहे. त्यामुळे भाजप आणि केंद्रावर टीका करणारे केजरीवाल हे आता शिवसेनेला आपलेसे वाटू लागले आहे, पण महापालिका निवडणुकीत ते आपलेसे वाटणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : ‘वरळीच्या महाराजा’लाच महापालिकेचा दे धक्का )
केजरीवालांची केंद्र सरकारवर टीका
काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन दिल्ली विधानसभेत बोलतांना मुख्यमंत्री अरविंद् केजरीवाल यांनी भाजपचे नेते या चित्रपटाचे पोस्टर लावत आहेत. याचसाठी हे राजकारणात आले होते का? उद्या यांच्या मुलांना कुणी विचारले की तुमचे बाबा काय काम करतात, ते काय सांगता पिक्चरचे पोस्टर लावतात म्हणून असे सांगत भाजपची या चित्रपटावरून खिल्ली उडवली. तसेच आठ वर्षे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी विवेक अग्निहोत्री यांच्यासमोर शरणागती पत्करली असे सांगत केंद्र सरकारवरही टीका केली. याबाबचे भाषण शिवसेनेच्यावतीने व्हायरल केले जात आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या फेसबूक पोस्टवरून या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करताच शिवसेनेला केजरीवाल आपलेसे वाटले.
महापालिका निवडणुकीत केजरीवाल शिवसेनेला जड जाणार
मात्र, आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत केजरीवाल यांचा ‘आप’पक्षही निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे मुंबईत ‘आप’ने उमेदवार उभे केल्यास आम आदमी पक्ष कुणाच्या विरोधात प्रचार करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेमुळेच मुंबईचा विकास होऊ शकला नाही, हे ‘आप’ला सांगताना शिवसेनेला टार्गेट केल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे केजरीवाल यांना शिवसेना आज केवळ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत असल्याने डोक्यावर घेऊन फिरत असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हेच केजरीवाल शिवसेनेला जड जाणार आहेत. त्यामुळे आज डोक्यावर घेऊन नाचा, उद्या त्यांच्या विरोधात शिव्या घालू नका अशाच प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत.
Join Our WhatsApp Community