अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेत (शिंदे गट) नाराजी असल्याची चर्चा असतानाच आता खाते वाटपावरुनही तिढा निर्माण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांना त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भूमिका आहे. त्यामुळे खाते वाटपाला आणखी काही दिवस लागू शकतात असेही म्हटले जात आहे. त्यातल्या त्यात काल कॅबिनेट नंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र बैठक झाली परंतु शिंदे, फडणवीस यांना नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी जायचे होते त्यामुळे काहीच तोडगा निघू शकला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली खाती काही मंत्री सोडायला तयार नाहीत. तर राष्ट्रवादीचे मंत्री ज्येष्ठ असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षात चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्री पदावरुनही तिढा निर्माण झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळाचीच पुनर्रचना? खातेवाटपातील गोंधळ संपेना!
राष्ट्रवादी काँग्रेसमधून सर्वच आलेल्या नव्या ९ मंत्र्यांना खाती देण्यावरून शिवसेना आणि भाजपमधून मोठा विरोध होत असून हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीश्वरांची मदत घेण्याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मंगळवारी शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे आणि यांच्याकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती, तसेच पालकमंत्रीपद देण्याला ठाम विरोध केला. खाते वाटपामुळे तयार झालेला मंत्रिमंडळ आणि पक्षांतील गोंधळ शमवण्यासाठी सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यावरही विचार सुरू आहे.
(हेही वाचा – सोलापूर : टेक्सटाईल कारखान्यात आग, तीन कामगारांचा मृत्यू)
बंगले आणि दालनात देखील होणार बदल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेले ज्येष्ठ मंत्री यांचे ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांना तसेच बंगले आणि दालनही द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे त्यामुळे सध्या असलेल्या मंत्री दालने आणि बंगले यातही बदल होऊ शकतो. दरम्यान मागील वर्षी शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील नेते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. अनेकांनी या संदर्भात आपली भावना बोलून दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आणि भाजपामधील काही नेत्यांना संधी मिळेल, अशी चर्चा असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांच्या इच्छेवर विरजण पडले आहे. जी मंत्रिपदे शिवसेना आणि भाजपमधील आमदारांना मिळणार होती, ती आता अजित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community