राष्ट्रवादीत वाद अटळ : अजित पवार गटाला अध्यक्ष म्हणून शरद पवार मान्य, पण त्यांचे निर्णय अमान्य

174
राष्ट्रवादीत वाद अटळ : अजित पवार गटाला अध्यक्ष म्हणून शरद पवार मान्य, पण त्यांचे निर्णय अमान्य
राष्ट्रवादीत वाद अटळ : अजित पवार गटाला अध्यक्ष म्हणून शरद पवार मान्य, पण त्यांचे निर्णय अमान्य

शरद पवार हेच आमचे अध्यक्ष असतील, पण त्यांनी घेतलेले निर्णय मात्र आम्हाला लागू नसतील, असे अजित पवार गटाने स्पष्ट केल्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत वाद अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. या वादाचे पडसाद रस्त्यावर उमटतात की न्यायालयापर्यंत पोहोचतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अजित पवार यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जशास तसे उत्तर देण्याचा सूचक इशारा दिला. शरद पवार हेच आमचे अध्यक्ष असतील, पण त्यांनी घेतलेले निर्णय मात्र आम्हाला लागू नसतील, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. आमच्या या निर्णयाला बहुसंख्येने पाठिंबा देण्यात आलेला आहे. लोकशाहीत बहुमताने घेतलेला निर्णय कुणीही अवैध ठरू शकत नाही. या मुद्द्यावरून वाद व्हावा, अशी आमची इच्छा नाही. पण काही वाद झाल्यास त्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकते. मात्र वाद होऊ नये असा आमचा मनापासून प्रयत्न असेल, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

त्यांच्याकडे किती आमदार ते सांगावे!

बहुसंख्य लोक आमच्यासोबत आहेत. पण, त्यांनी त्यांच्याकडे किती लोक आहेत ते सांगावे. आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की, पक्षाचे बहुसंख्य आमदार, पदाधिकारी यांच्या मताचा आदर करावा आणि हे चित्र पाहून आम्हाला आशीर्वाद द्यावा. तुम्ही चाचपणी करा, की पक्ष कुठे आहे. पक्षातील लोकांची इच्छा काय आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अनिल पाटील प्रतोदपदी कायम

राज्यातील राजकीय महाभूकंपादरम्यान अजित पवार यांनी सोमवारी मोठी खेळी करत शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासोबत आलेले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करत सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. यासोबतच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करताना अनिल पाटील हेच आमचे प्रतोद असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.