राज्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो, कारण या ठिकाणी माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली, मात्र आता मला विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णवेळ काम करायचे आहे, म्हणून त्यासाठी वेळ देता यावा याकरता पक्षाने मला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी आमच्या पक्ष नेतृत्वाला करणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषदेत केली.
काय म्हणाले फडणवीस?
आमचा पराभव झाला हे नक्की आहे, पण निवडणुकीतील गणिताचा विचार केला तर महाराष्ट्रात मविआला ४३.५१ टक्के मते मिळाली, तर एनडीएला ४३.६० टक्के मते मिळाली, म्हणजे केवळ अर्धा टक्काने आम्ही मागे आहोत. मविआला २ कोटी ५० लाख, तर आम्हाला २ कोटी ३८ लाख मते मिळाली आहेत, यामुळे मविआला ३० जागा मिळाल्या, त्यातही मुंबईत ४ जागा मिळाल्या, त्यांना २४ लाख मते मुंबईत मिळाली आहेत, तर एनडीएला २६ लाख मते मिळाली आहेत इथे आम्हाला २ लाख मते अधिक मिळाले आहेत, त्यामुळे आमच्या जागा ४-५ हजारांच्या फरकाने कमी झाल्या, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
विरोधकांनी निवडणुकीत जे नेरेटिव्ह तयार केले होते, त्याला प्रतिवाद करण्यासाठी आम्ही कमी पडलो. ज्यामध्ये मराठा आरक्षण, कांद्याचा भाव, शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तसेच जे काही उमेदवार उभे केले होते, त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती, ती ओळखण्यात आम्ही कमी पडलो, म्हणून आम्हाला नुकसान सहन करावे लागले. आता आम्ही लवकरच राज्यातील मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन कुठे चुका झाल्या आणि कुठे दुरुस्ती करावी लागेल, याचे चिंतन करणार आहोत, मी हरणारा माणूस नाही, नव्या उत्साहाने आम्ही पुन्हा तयारी करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis म्हणाले.
Join Our WhatsApp Community