कार्यालयाबाहेरील बाकडे हटवल्याने भाजपचे माजी नगरसेवक बसले व्हरांड्यात जमिनीवर

164
मुंबई महापालिका पक्ष कार्यालय सील केल्यानंतर आता  तेथील कार्यालयाबाहेरील बसण्याची आसनेही काढून टाकण्यात आल्यानंतर भाजपच्या  माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर आणि माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी चक्क व्हरांड्यातच ठाण मांडली. लोकप्रतिनिधीचे आधी कार्यालय बंद केलेत आणि आता तर बाकडेही काढले. त्यामुळे प्रशासनाकडे कोणतीही मानवता राहिली नसून आम्ही तळागाळातील गरीब जनतेचे नेतृत्व करत असल्याने बसायला बाकडे नसले तरी प्रसंगी जमिनीवर बसूनही काम करू शकतो. आम्ही जमिनीवरील माणसे आहोत असाच संदेश  प्रशासनाला दिला आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी या कार्यालयावर दावा सांगितल्यानंतर उद्धव गट आणि शिवसेना यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शिवसेना पक्ष कार्यालय सिल करण्यात आले होते.  त्यानंतर इतरही पक्षांची कार्यालये सिल करण्यात आली.
तेव्हापासून उद्धव ठाकरे गटासह भाजपचे माजी नगरसेवक हे कार्यालयाबाहेरील सोफ्यावर बसून राहायचे. कार्यालय बंद असल्याने नगरसेवकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सोफा तसेच बाकडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सोफा व बाकड्यांवर माजी नगरसेवक हे बसून असायचे. उद्धव ठाकरे गटाचे व भाजपचे माजी नगरसेवक हे सातत्याने  येत आहे. परंतु मागील आठवड्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना घेराव घालून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ही भेट पालकमंत्र्यांना दिलेले निधी वाटपाचे अधिकार काढून घेण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली. परंतु ही मागणी असतानाच मोठ्या संख्येने माजी नगरसेवक महापालिका मुख्यालयात प्रवेश केल्यामुळे आयुक्तांनी याची दखल घेत यापुढे जमावाने माजी नगरसेवकांना मुख्यालयात प्रवेश न देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी नगरसेवकांना केवळ कामानिमित्तच प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु भविष्यात याठिकाणी ठेवण्यात आलेल्या सोफा व बाकड्यांवर नगरसेवक येऊन बसल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासनाने शुक्रवारी रात्रीच या पक्ष कार्यालयाबाहेर असलेले सर्व सोफा व बाकडेच कायमच हटवले आहे.
सोमवारी होळी असल्याने कोणी राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी महापालिकेत फिरकले नाहीत. पण बुधवारी महापालिका मुख्यालयात कामानिमित्त आलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर व माजी नागरसेवक कमलेश  यादव यांना आपल्या पक्ष कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेले बाकडे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात क्षणभर विश्रांती घेतली. आम्ही माजी नगरसेवक झालो म्हणून प्रशासन असे वागणार का असा सवाल करत शिरवडकर व यादव यांनी जनतेची कामे करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यामुळे या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला मुख्यलयात यावेच लागणार आहे. त्यामुळे कार्यालय नाही, बाकडे नाही म्हणून आम्ही बसणार नाही असे नाही. खाली जमिनीवर बसून आणि निघून जाऊ. पण आज आम्हाला जमिनीवर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर आमच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलण्याची ताकद ठेवावी असा इशारा त्यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.