आता आशा कार्यकर्त्या संपावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशा वर्करना मानाचा मुजरा करतात पण देत मात्र काहीच नाही.

राज्य सरकार मानधन वाढवून देत नसल्याने, आता आशा कार्यकर्त्या नाराज असून, त्यांनी संपाचा इशारा दिला आहे.  आशा कार्यकर्ती व गटप्रवर्तक संघटनांच्या कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करणार आहेत.

फक्त मानाचा मुजरा, मानधन नाही

यासंदर्भात बोलताना आशा व गटप्रवर्तक संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष एम.ए.पाटील (ठाणे) म्हणाले, राज्यात 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत 15 जूनपासून संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या आशा वर्कर्सना मासिक ५ हजाराच्या आत मानधन असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशा वर्करना मानाचा मुजरा करतात पण देत मात्र काहीच नाही, अशी व्यथा पाटील यांनी मांडली.

(हेही वाचाः यंदा आषाढीची पायी वारी होणार, पण…! )

पगार ४ हजार, कपात ३ हजार

सरकार आम्हाला वेठबिगाराप्रमाणे राबवून घेत आहे. आमच्या सुरक्षेची कोणतीही काळजी कोणीही घेत नाही. केंद्र सरकार कोरोना कामाचे रोज 35 रुपये प्रमाणे महिन्याला 1 हजार रुपये देते, तेही वेळेवर मिळत नाहीत. राज्य सरकार 4 हजार देते, मात्र आरोग्य विभागाची 72 प्रकारची कामे कोरोनामुळे बंद पडली आहेत. त्यामुळे 3 हजार रुपये मानधन कापले जाते, असे आशा कार्यकर्तींचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागाची होणार पंचाईत

ग्रामीण भागात कोराेना काळात डाॅक्टरांची सर्व कामे आशा वर्कर करत आहेत. आता तर रॅपीड अँटीजेन टेस्टपासून ऑक्सिजन काॅन्सनट्रेटर सुद्धा लावण्याची कामे या कार्यकर्तींना दिली जाणार आहेत. मग वेतनवाढ का करत नाहीत, असा सवाल या संघटनांचा आहे. कोरोना काळात अशा कार्यकर्तींनी मोलाची कामगिरी केली आहे. अजून कोरोना संपलेला नाही, त्यात या कार्यकर्तींनी संपाचे हत्यार उपसल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची मोठी पंचाईत होणार आहे.

(हेही वाचाः टक्केवारीसाठी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मराठी ठेकेदाराची गळचेपी! मनसेने केला राडा)

या आहेत मागण्या

  1. कोरोना काळात केंद्र सरकार 33 रुपयांप्रमाणे 1000 रुपये देते ते वेळेवर मिळावेत.
  2. आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत.
  3. आशांना मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, ती मिळावीत.
  4. 3 हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला, सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जावी.
  5. नियमानुसार 4 तास काम करणे अपेक्षित असताना आशा कार्यकर्तींकडून 12 तास काम करुन घेतले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here