बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी, मिळाला विठुरायाच्या महापुजेचा मान!

122

महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे रविवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. दरम्यान, विठुरायाच्या दर्शन रांगेतील एका वारकरी दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांसह पूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. यंदा हा मान बीडच्या नवले दाम्पत्याला देण्यात आला.

नवले दाम्पत्य यांच्याबद्दल…

बीडच्या मुरली बबन नवले (वय 52) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले (वय 48) या शेतकरी दाम्पत्याने यंदा विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नवले यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा असून 1987 पासून गेली 35 वर्षे मुरली नवले हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत पंढरीच्या वारीत सहभागी होत आहेत.

पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणीमातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. शासकीय पूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्याला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एक वर्षभर मोफत प्रवासाचा पास दिला जातो. या प्रथेनुसार हा पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवले दाम्पत्यास सुपुर्त करण्यात आला.

तसेच, श्री विठ्ठल रुक्मिणीस दोन किलो वजनाचे सोन्याचे आकर्षक मुकुट दान केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सराफ व्यापारी विजयकुमार उत्तरवार व उत्तरवार यांचा सत्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल निर्मल दिंडी स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या दिंड्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्हे शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

विठुरायाच्या चरणी शिंदेंचं साकडं

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नीचा महापूजेनंतर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह समाजातील सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, कोविडचे संकट कायम स्वरुपी जाऊ दे असे साकडे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे वेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

4 पिढ्यांनी एकत्र घेतलं विठुरायाचं दर्शन

4 पिढ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंनी विठुरायाचं दर्शन घेतले. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, हे भाग्य सर्वांनाच मिळावं. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदेंसह त्यांचा मुलगा आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा 4 पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4 पिढ्यांनी दर्शन घेतलेले हे पहिले मुख्यमंत्री असावेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.