कोस्टल रोडच्या कामात १६०० कोटींचा भ्रष्टाचार! आशिष शेलारांचा घणाघात 

गेल्या वर्षभरात एकूण २८ लाख टन माल समुद्रात भरावासाठी टाकण्यात आला आहे, तो संपूर्ण माल निकृष्ट दर्जाचा होता, असे आशिष शेलार म्हणाले.

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी यापूर्वी ६ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात १००० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मुुंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते. या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमीतता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमदार आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कसा भ्रष्टाचार होतोय हे उघड केले. तसेच आता हा भ्रष्टाचार १६०० कोटींचा झाला आहे, असे सांगत भ्रष्टाचाराच्या आरोपात ६०० कोटींची वाढ झाली आहे.

कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा! 

कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम  सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचे असून या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे असे सांगत त्यांनी आजची पत्रकार परिषद घेतली. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईतील गल्लीतील रस्त्यांचे डांबरीकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत. तीच कार्यपध्दती याच आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधा-यांची असून प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. हे काय तुम्ही करून दाखवताय?, असा सवालही त्यांनी केला. ही अशीच कार्यपध्दती राहली तर मुंबईकरांच्या १४ हजार कोटी गेले वाहून असे होईल की काय, अशी भिती वाटते आहे. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा अशीच  भाजपाची भूमिका असून हा विषय शिवसेनेने प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प योग्य दर्जाचा व्हावा म्हणून यात होणा-या चुका आम्ही दाखवून देत असून त्या वेळीच सुधाराव्या असे आवाहनही आमदार आशिष शेलार यांनी केले.

(हेही वाचा : अनिल परबांचे कार्यालय तोडायची ऑर्डर आली…रामदास भाई म्हणाले ‘वाव…व्हेरी गुड!’)

प्रकल्पाला धोका निर्माण झाला!

या प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते बरोडा पॅलेस या पॅकेज १ या कामाबाबत डिसेंबर २०१९ ते २०२० या कालावधीत एका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे सादार करीत आमदार आशिष शेलार म्हणाले की, या प्रकल्पाला कायदेशीर पध्दतीने काम करण्यासाठी मुुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने दोन कंन्सल्टन नियुक्ती केली असून ए.ई.कॉम या कंपनीची जनरल कन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली असून लुईस बर्गर यांना प्रकल्प कंन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन कंपन्यांना ६०० कोटी रुपये देण्याचे स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेला या दोघांनी सल्लामसलत करून काम योग्य दिशेने होईल तसेच ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम होईल, यासाठी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन कंन्सल्टनने कुठल्या दर्जाचा माल भरावासाठी घेण्यात यावा, तसेच कुठल्या खाणीतून हा माल घेण्यात यावा या प्रमाणित खाणीच्या याद्या देण्यात आल्या. मालाची घनताही ठरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कंन्सल्टनेने ठरवून दिलेल्या खाणीतील माल न घेता तो अन्य खाणीतून निकृष्ठ दर्जाचा माल घेण्यात आला त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे.

भरावातही भ्रष्टाचार!

कोस्टल रोडच्या भरावासाठी कंत्राटदाराने अप्रमाणीत अशा गवाण ३५६/९ श्री कन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन ४१/१  वैभव कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. ५३ भत्ताद कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. ५४  दिप इंन्फ्रा, कुंडेवाल एस. एन. ५१/ २, कुंडेवाल एस. एन. ५८ या सहा खाणीतून भराव माल घेतला.  कंन्सल्टनेने प्रमाणीत केलेल्या नसताना या सहा खाणीतून का भरावाचा माल घेण्यात आला?, त्याचे लागेबांधे काय आहेत?, त्या खाणी कोणाच्या आहेत त्यातून होणारा नफा कोणाकडे जाणार आहे? या सहा अप्रमाणीत खाणीतून ८ लाख ४० हजार टन एवढा माल घेण्यात आला. दुस-या प्रकरणात खाण प्रमाणित आहे, मात्र त्या खाणीतून जो माल प्रमाणित केला गेला होता न घेता अन्य माल घेण्यात  आला आहे. त्यामध्ये गवाण ३५६/ ९ आणि कुंडेवाल एस. एन. ५१ /१ या दोन खाणीतील जो माल प्रमाणीत केला होता तो न घेता अन्य माल घेण्यात आला.

(हेही वाचा : गडकरी म्हणाले, आम्हाला विदर्भाची लाज वाटते!)

निकृष्ट दर्जाचा भराव टाकण्यात आला 

तर तिसऱ्या भागात कुंडेवाल एस.एन. ५३  कुंडेवाल एस. एन. ५४ ,कुंडेवाल एस. एन. ५१ /२, कुंडेवाल एस. एन. ५८ या खाणीतून आर्मर्र नावाचे भरणी मटेरिअर घेणे अपेक्षित नव्हते, तरी घेण्यात आले. तर पुष्पक नोड ही एक खाण अशी आहे की, ज्यावेळी यातील भराव माल घेतला त्यावेळी ती अप्रमाणित होती, मात्र माल घेतल्यानंतर ती प्रमाणित करण्यात आली, अशी बनवाबनवी करण्यात आली आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एकूण २८ लाख टन माल समुद्रात भरावासाठी टाकण्यात आला आहे, तो संपूर्ण माल निकृष्ट दर्जाचा होता. जे महापालिकेने नियुक्त केलेल्या कन्सल्टननेच सांगितले होते त्याचे पालन का झाले नाही? त्यावर लक्ष ठेवण्याचे काम महापालिकेच्या अधिका-यांचे होते, त्यावर लक्ष ठेवण्याचे काम कन्सल्टनचे होते, त्यावर दिशा देऊन योग्य लक्ष ठेवणे स्थायी समितीचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना आमदार आशिष शेलार यांनी पत्र लिहिले असून या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी देताना ज्या अटी शर्ती महापालिकेने मान्य केल्या. महापालिकेने ज्या अटी शर्ती सांगितल्या त्या दर्जाचे काम होताना दिसत नाही, त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी महापालिकेकडून तातडीने  खुलासा मागावा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. महापालिकेने कंत्राटदारांना वाचवणारी आणि भ्रष्टाचाराला पांघरून घालणारी भूमिका घेऊ नये, आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी चर्चेला तयार आहोत. त्या कामातील त्रुटी समजून घ्या, सत्ताधारी शिवसेनेन प्रतिष्ठेचा विषय करू नये अन्यथा दिवाळीपूर्वी आणखी भ्रष्टाचाराचे फटके वाजतील, असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here