मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटींची तरतूद का केली? ॲड. आशिष शेलारांचा सवाल

मुंबईतील खड्डे हा विषय सध्या गाजत असून भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी या विषयावर भाष्य करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला.

71

मुंबईतील सुमारे २ हजार किमीच्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत, असे महापालिका सांगत आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींंची तरतूद केली ती याच ९२७ खड्ड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल, असा टोला लगावला. मुंबईतील खड्डे हा विषय सध्या गाजत असून भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी या विषयावर आज भाष्य करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला.

मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले त्यावर केवळ ९२७ खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. महापालिका दररोज नवी हसवणुकीची स्पर्धाच करते आहे, असे चित्र आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला मग तो या ९२७ खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे, त्याची चौकशी सुरु आहे, चौकशीत सत्य समोर येईलच, असेही शेलार म्हणाले.

(हेही वाचा : सारंगी महाजनांची राजकारणात होणार एन्ट्री! का आणि कधी? वाचा…)

संपूर्ण मुंबई म्हणजे वरळी नव्हे!

मुंबईच्या महापौरांना आमचा सवाल आहे की, पूर्ण मुंबईचे संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असते का? विकासासाठी तुम्ही कधी संपूर्ण मुंबईचा नकाशा पाहता का? याचे कारण नवीन फूटपाथ करायचा विषय आला की, फक्त वरळी..सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तरही वरळी…मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते..आता थ्रीडी मॅपिंग करायचे आहे तर तेदेखील वरळीत.. कोविड सेंटर बनवायचे असेल, तर तेही वरळीत.. आणि पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर… वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही? असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.

मंत्री राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी!

मंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून प्रकरण संपणार नाही, आपल्या कृत्यावर, पापांवर माफी मागितली म्हणजे पडदा पडणार नाही. ज्या आमच्या विद्यार्थ्यांची ही संधी हुकली त्यांनी केलेली मेहनत, कुटुंबाचा त्याग आणि त्यानंतर त्यांचे झालेले नुकसान याला आरोग्य खाते जबाबदार आहे. काही दलालांना आधीच  प्रश्नपत्रिका कशी मिळाली? ती ठराविक लोकांपर्यंत कशी पोहचते? पोलिस यंत्रणा याबाबत कसे काही कळत नाही? हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे का? त्यामुळे माफी मागायची आणि पळ काढायचा असे करता येणार नाही. राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आरोग्य विभागाच्या परिक्षांवर प्रतिक्रिया दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.