आरक्षणाबाबत चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड”! शेलारांचा आरोप 

आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांच्या एकूणच कार्यपद्धती व भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

158

मराठा आरक्षणाचा पूर्ण विचका करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका म्हणजे तोंडात गोड अन् मनात खोड अशी आहे, असा आरोप भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी केला. मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतीत संवाद साधण्यासाठी आशिष शेलार चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

चव्हाणांचा घेतला समाचार

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांचे बोलणे आणि करणे यामध्ये फरक आहे. आरक्षण टिकणार असे सांगत होते आणि प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या बाजूने युक्तिवादच केला नाही. गायकवाड आयोगाने समाजाचे संपूर्ण मागासलेपण सिध्द केले. पण त्यातील परिशिष्ट इंग्रजी अनुवादासह न्यायालयात मांडली नाहीत. सर्वांना हातात हात घालून चालले पाहिजे असे म्हणायचे, पण मराठा समाजाच्या प्रतिनिधींंची समन्वय बैठकच घेतली नाही. त्यावर प्रतिक्रिया आल्यावर बैठका घेतल्या. चांगले वकील दिले, पण वकिलांना सरकारने माहितीच द्यायची नाही. न्यायालयात वकीलांना हे सांगावे लागले. 102व्या घटनादुरुस्तीवर केंद्राने भूमिका स्पष्ट करा म्हणायचे आणि जेव्हा केंद्राने भूमिका मांडली, तेव्हा त्याचे समर्थन न करता आता इंद्रा सहानी निकालावर बोलायचे. आरक्षणाचा कायदा करा असे सांगत राज्यपाल महोदयांना भेटायचे, त्याच दिवशी काँग्रेसचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आरक्षण नंतर मिळाले तरी चालेल पण सवलती द्या, असे म्हणायचे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपूर्ण भूमिका ही तोंडात गोड अन् मनात खोड अशीच आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांचा शेलार यांनी समाचार घेतला.

(हेही वाचाः हजारो रुग्ण भरडले गेल्यानंतर सरकारला सुचलं शहाणपण! दरेकरांची टीका)

चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना का केले नाही

अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडताना वेळोवेळी दिखाऊपणा केला. आज ते इंद्रा सहानी निकालाचा फेरविचार करा, असे केंद्र सरकारला सांगत आहेत. मग काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना, स्वतः मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी हे का केले नाही? केंद्राने ठराव आणि कायदा करुन आरक्षण द्यावे, असे अशोक चव्हाण सांगत आहेत. राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपतींनी आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत. मग कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळता आरक्षण दिले तर ते टिकेल का? असे प्रश्न उपस्थित करुन, आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांच्या एकूणच कार्यपद्धती व भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.