खावाले काळ नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार, भाजपची टीका

73

राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारचे वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच करावं लागेल, अशी अहिरणी भाषेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. आशिष शेलार मंगळवारपासून तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून, नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. एका अभद्र युतीतून कंत्राटावरच्या कट कमिशनसाठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे, जे गेल्या दोन वर्षांत मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजून मंत्रालयातच नाही पोहोचले, ते नंदुरबार सारख्या अती दुर्गम भागात कधी व कसे पोहोचणार? राज्याचे सरकार नाही पण नंदुरबार पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मात्र पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना सुरू असलेला हा जिल्हा आहे.

शेलार यांचा सवाल

नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. 20 जुलैपर्यंत 3 लाख 5 हजार हेक्टर पैकी 1 लाख हेक्टर पर्यंत पेरणी झाली, तर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पीक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. 20 हजारपेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही, अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवाल ही त्यांनी केला.

भाजप आक्रमक पावले उचलेल

शेतीच्या, पाण्याच्या अडचणीमध्ये असताना ठाकरे सरकार नंदुबारमध्ये नाहीच, पण पालकमंत्रीही गायब आहेत. आदिवासींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत, पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं “कट कमिशन” घेणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांवर केला आहे. याबाबत भाजप आक्रमक पावले उचलेल, असेही ते म्हणाले.

रोज काहीतरी बोललच पाहिजे, असा अट्टहास म्हणजे नवाब मलिक

रोज काहीतरी बोललंच पाहिजे असा अट्टहास असलेले नेते म्हणजे नवाब मलिक, असे सांगत राज्य सरकार पूरग्रस्त भागापर्यंत पोहोचलं नाही, पण राज्यपाल पोहोचले यावर खरंतर सरकारला शरम वाटली पाहिजे. पण राज्यपालांवर टीका करुन वातावरण निर्मिती करण्यापलीकडे काही करत नाहीत. नवाब मलिक यांच्या सरकारचा पराभव आहे, म्हणूनच जनतेला राज्यपालांकडे दाद मागावी लागते, असंही ते म्हणाले.

पॅकेजवरही डागली तोफ

पूरग्रस्तांसठी जाहीर केलेल्या पँकेज बाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, मी पँकेज देणारा नाही तर मदत करणारा अस मुख्यमंत्री म्हणाले होते पण ते शब्दावर फिरले का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेल पँकेज अजून जनतेला पोहोचलच नाही. तातडीची १० हजाराची मदत मिळालेली नाही अशी अवस्था आहे. घोषित होत पण पोहोचत नाही अस ठाकरे सरकारच पँकेज असतं. या संकटाची व्याप्ती ही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.

सरकारचे निर्बंध म्हणजे खाली डोकं वर पाय

दोन लसी घेतलेल्यांना सूट द्या, असं न्यायालय सांगत आहे. पण काय नियम लावतात त्याला निर्बंध नाहीत. देऊळ बंद पण पब, बार सुरू अशी अवस्था आहे. प्रत्येक जण वेगवेगळी विधानं करतात. सरकारच्या तीन पक्षांत बेदीली असल्याने एकवाक्यता नाही. सरकार जनतेबाबत बेफिकीर आहे, असं ते म्हणाले.

विमानतळावर शिवसेनेचं टक्केवारीचं आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाला य धक्का लावल्यास भाजप विरोध करेलच. मात्र हस्तांतरणाचा ठराव कँबिनेट मधे कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग बाहेर आंदोलन कशाला ? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही ? विरोध पण आपणच करायचा आणि समर्थन ही द्यायच अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत, अशा शब्दांत त्यांनी आंदोलनावर टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.