Ashish Shelar : आशिष शेलार मंत्री बनले? पालकमंत्र्यांच्या मधोमध खुर्चीत बसून घेतली महापालिकेत बैठक

240

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शहर आणि उपनगराच्या पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीला उपस्थित राहिले.  परंतु पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला प्रत्यक्षात हे मंत्री महोदय बाजुला बसले आणि जणू काही आपणच मुख्यमंत्री असल्यासारखे शेलार या दोन्ही मंत्र्यांच्या मधोमध बसले. त्यामुळे दोन्ही पालकमंत्री महोदयांकडून राजशिष्टाचाराचे पालन होत नसून त्यांचा राजशिष्टाचार पाळण्याचा प्रयत्न सोमवारी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दाखवला नव्हता. त्यापाठोपाठ मंगळवारी तर त्यांच्याच पक्षाच्या मुंबई अध्यक्षांनीही राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करून टाकल्याने पालकमंत्र्यांकडून कधी पाळला जाणार प्रोटोकॉल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पालकमंत्री लोढा यांनीही मोडला राजशिष्टाचार 

मुंबई महापालिकेत उपनगराचे पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांना नागरीक तक्रार निवारण कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांना भव्य असे कार्यालय उपलब्ध करून दिल्यानंतरही सोमवारी मंगलप्रभात लोढा यांनी खड्डयांच्या मुद्दयावर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना आपल्या दालनात किंवा आयुक्तांच्या शेजारील सभा दालनात बोलावून बैठक घ्यायला हवी होती. परंतु तसे न करता लोढा यांनी सर्वसाधारण नगरसेवकाप्रमाणे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या कार्यालयात जावून खड्डयांबाबतच्या सूचना केल्या. मुळात महापालिकेत कॅबिनेट मंत्री महोदय हे महापौर किंवा आयुक्त यांच्या कार्यालयात उपस्थित राहू शकतात किंवा मंत्रालयात त्यांना बोलावून घेऊ शकतात. प्रोटोकॉल विचारात घेता पालकमंत्र्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात जावून बैठक घेणे हे मंत्रीपदाचे महत्व कमी करण्यासारखे आहे. अतिरिक्त आयुक्त वेलरासू हे सनदी अधिकारी असल्याने त्यांनी आयुक्तांच्या दालना शेजारी असलेल्या सभा दालनात नेऊन तिथे बैठक घ्यायला हवी होती. परंतु वेलरासू यांनी तसेच केले नाही.

(हेही वाचा Ganeshotsav : मूर्तिकारांसह गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना केवळ १०० रुपयेच भरावे लागणार अनामत रक्कम)

पुन्हा राजशिष्टाचार मोडला 

त्यामुळे मंत्र्यांच्या प्रोटोकॉलवरून प्रश्न उपस्थित होत असतानाच मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या  पार्श्वभूमीवर उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी मूर्तिकार आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हेही उपस्थित होते. परंतु याठिकाणीही प्रोटोकॉल पाळला गेला नाही. दोन्ही पालकमंत्री हे शेजारी शेजारी बसून त्यांच्या शेजारी आमदार शेलार  यांनी बसणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता दोन्ही पालकमंत्र्यांच्या मधोमध शेलार बसले गेले. जिथे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बसू शकतात. त्यामुळे दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या मधोमध एक आमदार बसणे हे कोणत्याही शिष्टाचाराला धरुन नसून खुद्द शेलार यांना हा शिष्टाचार कळला नाही कि त्यांनी लोढा आणि केसरकर यांना आपणच तुमच्यापेक्षा मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.