महाविकास आघाडी सरकार ‘तीन पैशांचा तमाशा’ नाटकाप्रमाणे!

174

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. दोन वर्षांच्या सरकारच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवतीच फिरणारे आहे. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा या नाटका प्रमाणे तीन पक्षांचा तमाशा आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

२ वर्षांत महाराष्ट्राला असंख्य वेदना

आघाडी सरकारच्या दोन वर्षानिमित्ताने प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या त्या मांडत आहोत. काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच याचं नाटक आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडतो आहे, असे शेलार म्हणाले.

(हेही वाचा भारताच्या ‘रूपे’ ने उडवली ‘व्हिसा’, ‘मास्टर कार्ड’ ची झोप!)

महाराष्ट्राची बदनामी

अडचण काहीच नाही एखाद्याला आपला पुत्र चांगलं काम करावा, मोठा व्हावा असं वाटतं. त्याच्या नेतृत्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटलं तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले, हे पहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचं दिसतं. राज्याची जगासमोर जी प्रतिमा गेली ती पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन अशीच दुर्दैवी गेली. मग जेव्हा मुंबईकर लोकल ट्रेन सुरु करा, असे म्हणत होते तेव्हा पब आणि बार सुरु केले गेले. जेव्हा मंदिर उघडा अशी मागणी झाली तेव्हा मदिरालाय उघडी केली, असे निर्णय पुत्र प्रेमाने झाले. तसेच सुपुत्रीच्या प्रेमापोटी गृहमंत्री पदी अनिल देशमुख यांना बसवले, त्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणारे वसुली, मटका किंग, बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलिस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे चित्र समोर आले. महाराष्ट्राची ही वेदना आहे, असे शेलार म्हणाले.

अहंकार सरकारच्या ठायी ठायी

मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही, माझ्याविषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले सरकार हे सरकार आहे, असेही शेलार म्हणाले.

सरकार असंवेदनशील

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 50 हजार देऊ म्हणणारे 10 हजाराची घोषणा केली, तेही देऊ शकले नाहीत. एफआरपीसाठी आंदोलने झाली, पण हे सरकार तीन टप्प्यात एफआरपी नको म्हणते, कोरोना काळात देशाचे अर्थचक्र ज्या शेतकऱ्यांनी चालवले त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली जात आहे. महिला अत्याचाराच्या बाबतीत तर अत्यंत असंवेदनशीलपणा दिसतो. गेल्या सात महिन्यात मुंबईत 550 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेलेत. बाकी पक्षाचे मंत्री, युवा संघटनेचे पदाधिकारी, मंत्री राजीनामा हे विषय सगळ्यांना माहिती आहेच. शक्ती कायदा कुठे आहे?, असा सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी 11 वीचे प्रवेश कधी संपणार? मराठा समाजाचे आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. भूमिका काय? ओबीसी राजकीय आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. सरकार काय करणार?, अशा प्रत्येक आघाडीवर सरकार असंवेदनशील वागतेय या आमच्या वेदना आहेत, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.