आता विद्यापीठांत ‘पदवीदान’ नव्हे, तर ‘भूखंडदान’ समारंभ होतील!

175

अधिवेशनाचा अखेरचा दिवस गोंधळात संपला. अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आले. विरोधकांना चर्चा न करू देताच विधेयक मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. आता, भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवर दोन ट्विट करत, विद्यमान सरकारने थेट विद्यापीठात राजकीय घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच, आतापर्यंतच्या महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत झालेल्या घटनांचा पाढा वाचत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आशिष शेलार यांनी काय म्हटले

भविष्यात परिक्षांमध्ये घोटाळे नको असतील, बोगस पदव्या वाटप नको असेल, विद्यापीठात एखादा “सचिन वाझे” नको असेल, विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारी ऐवजी कंत्राटातील टक्केवारीची चर्चा नको असेल, तर..
महाराष्ट्रातील तमाम सुविद्य नागरिकांनी या विरोधात बोलायला हवे! असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यामातून जनतेला केले आहे.

तसेच, ज्यांनी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा “बालहट्ट” केला त्यांच्याच उपस्थितीत पदवीदान समारंभ झाला.
आता स्वायत्तेवर घाला घालून विद्यापीठात राजकीय घुसखोरी करण्यासाठी ज्यांनी कायदा बदलला. त्यांच्याच हस्ते भविष्यात विद्यापीठांमध्ये “भूखंडदान” समारंभ होऊ शकतो, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

( हेही वाचा: टॅक्सीसाठी हात दाखवताय, पण ती रिकामी आहे का? आता सहज समजणार…)

विधेयकाविरोधात भाजप न्यायालयात जाणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारचा दिवस लोकशाहीसाठी ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाने चर्चा न करताच विधेयक मंजूर केले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. एकप्रकारे ही लोकशाहीची हत्या आहे. विद्यापीठ, विश्वविद्यालय यांना राजकारणापासून दूर ठेवण्यात यायला हवे, मात्र आता या विधेयकामुळे विद्यापीठांना एकप्रकारे सरकारी महामंडळ म्हणून वापर करण्याचा विचार केल्याचे त्यांनी म्हटले. या विरोधात भाजप न्यायालयात जाणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. तसेच जानेवारी महिन्यात भाजप या विधेयकाविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा गंभीर इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.