मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?

123

मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय? यापुढची एल्गार परिषद आता विद्यापीठांमध्ये होणार आहे काय? राजाबाई टॉवरच्या बाजूला आता दुसरा मिनार उभा करणार आहात काय? विद्यापीठांची उपकेंद्रे शिवसेना शाखेतून वाटले जाणार आहेत काय? परीक्षांची काठीण्य पातळी, अभ्यासक्रम शिवसेना शाखेमध्ये ठरवणार आहात काय?, अशा आक्रमक प्रश्नांचा भडीमार करीत भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आज भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करणारा ठराव कार्यकारणीत मांडला, त्या ठरावावर आमदार अँड. आशिष शेलार यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात

यावेळी त्यांनी विद्यापीठ कायद्यात बदल करताना विद्यमान सरकारने कसा राजकीय चंचूप्रवेश केला आहे, कसे राज्यपालांचे, कुलगुरूंचे अधिकार सीमित केले आहेत, विद्यापिठांची स्वायत्ता धोक्यात आणली गेली आहे, यावर आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सविस्‍तर विवेचन केले. या विधेयकाच्‍या उद्देशांमध्‍ये ज्‍या बाबी सरकार सांगते आहे, त्‍याचा आणि केलेल्‍या बदलांचा समन्‍वय नाही. किंबहुना हे म्‍हणजे बिरबलाच्‍या खिचडीसारखे आहे, असे न म्‍हणता आघाडी सरकारचा विषय असल्‍याने हे बिरबलाच्‍या बिर्याणीसारखा प्रकार असल्‍याचे वर्णन त्‍यांनी केले.

अहंकारातून केला गेला कायदा

भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब समाजातील विद्यार्थी, पत्रकार, बुध्दीवान, विचारवंत, पालक यांच्यापर्यंत घेऊन जायला पाहिजे, याचीही मुद्देसुद मांडणी केली. या कायद्याचे भविष्यात विद्यापीठांवर होणारे परिणाम किती दाहक असतील या विषयावर बोलताना मात्र आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्‍ला चढवला.
महाराष्‍ट्रातील सरकार जेव्‍हा स्‍वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्‍या विरोधी भूमिका घेते, त्‍यावेळी सावरकरांच्‍या बाजूची भूमिका मांडली म्‍हणून योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठातून काढून टाकण्‍यात आले. यावरुन स्‍पष्‍ट होते की, भविष्‍यात सरकारी पक्षांच्‍या विचारांचे वाहक असतील त्‍यांनाच कुलगुरू केले जाईल. जो सरकारी पक्षाचा लालघोटेपणा करील त्‍यालाच कुलसचिव केले जाईल, असेच एखाद्याला परिक्षा नियंत्रक केले जाईल. यापुढे परिक्षांचे वेळापत्रक, काठिण्‍य पातळी, विद्यापीठांचे अभ्‍यासक्रम, पुस्‍तके, पुस्‍तकांचे रंग शिवसेना शाखेत ठरवले जातील. प्राध्‍यापकांना सरकारी पक्ष त्‍यांचा प्रचार करायला उतरवेल, जो पक्षाचा प्रचार करेल त्‍यालाच प्राध्‍यापक म्‍हणून घेतले जाईल, त्‍यासाठी हा चंचूप्रवेश केला जात असून मंत्र्यांना त्‍यासाठी अधिकार दिले जात आहेत. त्‍यांच्‍या मर्जितील माणूस विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी असेल, तर विद्यापीठातील भूखंड वाटप सोपे जाईल यासाठी हा चंचूप्रवेश करण्‍यात येत असून, मी सांगेन तेच धोरण आणि मी बांधेन ते तोरण याच अहंकारातून हा कायदा करण्‍यात आला आहे.

( हेही वाचा :धक्कादायक! मुंबईत 3 हजार कोटींचा पाणी घोटाळा…)

धोका समाजासमोर मांडावा लागेल

महाराष्‍ट्र विद्यापीठ कायद्यात जो बदल करण्‍यात आला आहे, तो आजपर्यंतच्‍या महाराष्‍ट्राच्‍या शिक्षणा‍विषयीच्‍या लौकीकाच्‍या आणि नव्‍या राष्‍ट्रीय धोरणातील उद्देशाच्‍या विरोधात आहे हेही त्‍यांनी लक्षात आणून दिले. आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हे आपण बोलतोय हे केवळ विरोधाला विरोध करण्‍यासाठी नाही. भावी पिढीसाठी बोलतोय, कोणत्‍याही राजकीय हेतूने आणि फायद्यासाठी बोलत नसून, भविष्‍यातील पिढ्यांसाठी बोलत आहोत. भविष्‍यात जर महाराष्‍ट्रातील विद्यापीठांनाही जेएनयुप्रमाणे राजकीय आखाडा करायचा नसेल, तर या बदलामुळे भविष्‍यात उद्भवणारे धोका आपल्‍याला समाजासमोर मांडावे लागतील, असेही युवा मोर्चाला सूचित केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.