सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी! भाजपाची मागणी 

कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'होय, मी जबाबदार' असा प्रचार केला, त्यात त्यांनी बदल करून 'होय मी बेजबाबदार' असा केला काय?, असे शेलार म्हणाले. 

कायदा आणि सुव्यवस्था कोण हातात घेईल, हे माहिती असताना नोटीस मात्र किरीट सोमय्यांना देण्यात आली. सरकारी यंत्रणेने हा गुन्हा केला आहे. मुख्यमंत्र्यांना या कारवाईची माहिती नाही, असे काही जण म्हणत आहेत, हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे. हे कायद्याचे राज्य आहे का? मुख्यमंत्री कारवाईबाबत अवगत नसणे गंभीर आहे. याची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्याची कणखर भूमिका रसातळाला जायची नसेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्री करतील, असे भाजपाचे नेते आशिष शेलार म्हणाले.

पोलिसांनी खोटी नोटीस दाखवली! 

राज्यात प्रशासकीय आणि राजनैतिक व्यवस्था देखील भ्रष्ट झालेली आहे. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध कशाला केले, काल मुंबईत सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा होता. कोल्हापूरला येऊ नये म्हणून त्यांना जी नोटीस दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीला खोटी नोटीस दिली जाते. पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. त्यानंतर खरी नोटीस दाखवण्यात आली, ती आधीच का दाखवली नाही, असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला.

(हेही वाचा : आता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना : मुश्रिफांच्या जावयाचा १०० कोटींचा घोटाळा!)

मुख्यमंत्री आता बेजबाबदार झाले का? 

किरीट सोमय्या यांना मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यापासून वंचित ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या घटनेची चौकशी तुम्हाला करावी लागेल. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष घाबरले आहेत. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘होय, मी जबाबदार’ असा प्रचार केला, त्यात त्यांनी बदल करून ‘होय मी बेजबाबदार’ असा केला काय?, असेही शेलार म्हणाले.

महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आता व्यक्त व्हा

गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घटना घडत आहेत आणि सरकारी पक्षाकडून ज्या घटना घडत आहेत त्यातून एक प्रश्न निर्माण होतो कि, लोकशाही मूल्यावर आधारित सरकार अस्तित्वात आहे का? महाराष्ट्र अराजकतेकडे जात आहे. सोशल मीडियावर जर कुणी व्यक्त झाले, तर मुंडन केले जाते. माजी अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो, संपादकाने टोकाची भूमिका घेतली तर त्याला घरात घुसून अटक केली जाते. एका केंद्रीय मंत्र्याला अटक होते, दहशतवादी कारवाया होत असताना एटीएस गप्प बसते, माजी गृहमंत्री गायब आहेत, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले का? काल-परवापासून एक चित्रफीत फिरत आहे. लखोबा लोखंडे पेज चालवणाऱ्या एका मराठी माणसाला शिवसैनिकांनी तुडवून तुडवून मारले आहे. माझी हात जोडून विनंती आहे की, आता नागरिक आणि पत्रकारांनी व्यक्त व्हायची गरज आहे, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here